Cannes : 'कान्स' चित्रपट महोत्सवात झळकणाऱ्या 'छकुली'स लाखमोलाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:11 PM2022-05-17T16:11:28+5:302022-05-17T16:16:07+5:30
Cannes : मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात
मुंबई - यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज केली.
मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पोटरा’ या चित्रपटातील कलाकार कु. छकुली प्रल्हाद देवकर (वय १५ वर्षे) हिचा ‘पोटरा’ हा पहिला चित्रपट असून यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-२०२२ मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवासी असलेल्या कु. छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वतःचे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते, ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कळताच त्यांनी छकुलीला आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज जाहीर केले.