Join us

Sharad Pawar: धमक्या देऊन आवाज बंद करु शकत नाही; माझा कायदा अन् सुव्यवस्थेवर विश्वास, शरद पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 4:45 PM

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील अनेक नेते याचा निषेध करत आहे. तर धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका अज्ञात व्यक्तीने ट्विटच्या माध्यमातून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. 

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील अनेक नेते याचा निषेध करत आहे. तर धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याचदरम्याम या प्रकरणावर आता स्वत: शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे, असं असताना धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद कराल असे वाटत असेल तर हा गैरसमज असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामुळे मला चिंता नाही. धमकीची मला कोणतीही चिंता नाही. मात्र कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांना देण्यात आली आहे, ज्यांच्यावर आहे, त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत, असे ट्वीट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

'गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी'

या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेश बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण अॅडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या काॅमेंटर वाचल्या एवढा द्वेश कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. 

पवारांना धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक व्हावी- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पवार यांच्यासारख्या व्यक्तीला धमकी देणाऱ्याला तत्काळ अटक करून तुरुंगात टाकले पाहिजे. पवारांसारख्या वरिष्ठ नेतृत्वाला धमकी देणे योग्य नाही. राज्य सरकारकडून योग्य कारवाई करण्यात यावी, असे बावनकुळे म्हणाले. धमकी देणारा व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असला तरी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसपोलिसमहाराष्ट्र सरकार