लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कामगारांनी तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवला. संपामुळे शनिवारीही बेस्टच्या सुमारे एक हजार बस आगारातच उभ्या होत्या. रस्त्यावर आजही बस धावत नसल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाल्याने इच्छितस्थळी जाण्यासाठी मुंबईकरांना जादा पैसे मोजून रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, उबरची मदत घ्यावी लागली. अतिरिक्त गाड्या, एसटी सोडूनही दिवसभर बेस्टचा गोंधळ सुरूच होता.
वेतनवाढ करण्यात यावी, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, बसचा प्रवास मोफत करण्याची मुभा द्यावी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी २ ऑगस्टपासून आंदोलन सुरू केले आहे. डागा ग्रुप या भाडेतत्त्वावरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनात गुरुवारी मातेश्वरी आणि हंसा या कंपनीच्या कंत्राटी कामगारांनीही सहभाग घेतला. या आंदोलनाची झळ मुंबईकरांना बसली असून, प्रवाशांचे आजही हाल झाले.
अधिवेशन संपले. आमदार, मंत्री आपापल्या गावी गेले. मुंबईकर मात्र बेस्टच्या संपामुळे रस्त्यावरच लटकले. त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला काेणालाही वेळ नाही. गेले तीन दिवस संप सुरू आहे. टॅक्सीचे मीटर २८ रूपयांनी तर रिक्षाचे मीटर २३ रूपयांनी सुरू हाेते. सर्व सामान्य नागरिकांना बेस्ट शिवाय पयार्य नाही मात्र या यंत्रणेने हात वर केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकरांकडे लक्ष देतील का ?
५ रुपयांसाठी २८ रुपये मोजावे लागलेदर्जेदार आणि किफायतशीर सेवा देणाऱ्या बेस्टच्या बसमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. साध्या बसचे तिकीट ५ रुपये तर एसी बससाठी ६ रुपये मोजावे लागतात. मात्र, या आंदोलनामुळे टॅक्सीसाठी २८ ते ४० रुपये खर्च करावे लागत आहेत. कॅबसाठी तर १०० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत. इतकेच नव्हेतर, शेअर टॅक्सी कॅब चालकांनी आंदोलनाचा फायदा घेत प्रवाशांकडून लूट सुरू केली आहे.