लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लिफ्टमध्ये भेट झाली तरी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत जाऊ शकत नाहीत, अशी टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे-फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवर केली. ठाकरे दोन वर्षांपूर्वी लिफ्ट शिफ्ट करून काँग्रेससोबत गेले. त्यामुळे जनतेच्या लिफ्टमध्ये येऊन त्यांच्या मनातील सरकार स्थापन केले, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला. आम्हाला लीकेज सरकार म्हणतात; पण ते अडीच वर्ष सिक (आजारी) होते, तर मग सिकेज होते का? असे प्रत्युत्तरही त्यांनी ठाकरेंना दिले.
पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरीपंचतारांकित शेतीच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी की नाही? शेतकऱ्याने चांगली पंचतारांकित शेती करू नये का? नगदी पिके घेऊ नये का? त्यांच्या डोक्यात अमावस्या-पौर्णिमा चालतात. लिंबू-मिरच्यावाले विचार असतात. मी त्यांना माझ्या शेतातली सगळी फळे पाठवीन, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तुमचे भाऊ कुठे आहेत?लाडका भाऊबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “आम्ही लेक लाडाची केलेच. लाडकी बहीण-लाडका भाऊही करू. पण, हे बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? त्यांनी तरी विचार करावा, आत्मपरीक्षण करावे. का सगळे भाऊ गेले? आम्ही सगळ्या भावांचा-बहिणींचा विचार करणार. तुम्हाला कळेलच.