चालू शकत नाही, रेशन कोण देणार? पॅरालिसिस झालेल्या वृद्धेची उपासमार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:25 AM2020-05-20T06:25:24+5:302020-05-20T06:25:50+5:30
- गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात गरजूंपर्यंत जेवण मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. याच परिसरात राहणाऱ्या ...
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात गरजूंपर्यंत जेवण मिळत नसल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. याच परिसरात राहणाऱ्या आणि पॅरेलिसिसचा झटका आल्याने अंथरुणाशी खिळलेल्या महिलेचा व्हिडीओ ‘फेसबुक’वर व्हायरल झाला. याची माहिती खासगी संस्थेला मिळताच तिचा शोध घेत अखेर त्यांनी तिच्यापर्यंत रेशन पोहोचविले. त्यानुसार मालवणीत सध्या गरिबांची काय स्थिती आहे याचा अंदाज येत असून प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकाने योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे.
हुस्ना बानो (६०) असे या वृद्धेचे नाव असून त्या आंबोजवाडीमध्ये वॉर्ड क्रमांक ४९मध्ये राहतात, जिथल्या नगरसेविका संगीता सुतार या आहेत. हुस्ना यांच्या पतीचे २००९ साली निधन झाल्यानंतर बोरीवलीत त्या कामावर जाऊन उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र चार वर्षांपूर्वी त्यांना पॅरेलिसिसचा झटका आला. त्यात त्यांचा एक हात आणि पाय निकामी झाल्याने अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून तिचे लग्न झाले आहे. तर मुलगा आजारी असल्याने तोही घरीच असतो. गेल्या अनेक दिवसांपासून बानो यांच्या घरी खाण्यासाठी अन्नाचा एक दाणाही नव्हता. ‘मी घराच्या दरवाजातून नुसते लोकांना अन्न आणि रेशन नेताना पाहायची. मात्र कितीही विचारणा केली तरी कोणीच लक्ष देत नव्हते. कधी तरी खिचडी मिळाली की ती खाऊन मी दिवस ढकलत होते. चालता येत नसल्याने कोणाकडेही जाऊन खिचडी किंवा धान्य आणणे मला शक्य नव्हते, त्यामुळे उपाशी मरण्याची वेळ माझ्यावर आली होती. मात्र फिरोज शेख सरांनी माझा पत्ता मिळवत घरी रेशन पोहोचविले आणि आमच्या घरी चूल पेटली. मी आभार व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.
तीन दिवसांनी सापडला पत्ता आणि धान्य दिले
माझ्याकडे एक व्हिडीओ मित्राने पाठवला होता, ज्यात हुस्ना बानो यांची परिस्थिती आम्हाला समजली. त्यानंतर मी आणि आमच्या मुलांनी सतत तीन दिवस त्यांचा शोध घेतला आणि त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचविले.
- फिरोज शेख,
सचिव, वंदे मातरम् शिक्षण संस्था