लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वर्षा बंगल्यावरील चहापानाच्या खर्चाच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘वर्षा’ गेले अडीच वर्ष बंद होते. सहा सात महिन्यांपासून लोक ‘वर्षा’वर येत आहेत. ‘वर्षा’वर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? असा सवाल करताना ज्यावेळी फेसबुक लाइव्ह सुरू होतं, तेव्हा वर्षा बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहिती अजित पवारांनी घ्यायला हवी होती, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
सत्तेच्या बाहेर पडल्यामुळे अजित पवार वैफल्यग्रस्त झाले असून माझ्यावर निष्ठा बदलल्याचा आरोप केला जातो. पण मी अजित पवारांसारखी एकदा फडणवीस यांच्यासोबत नंतर पुन्हा मविआकडून शपथ घेतलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी फिरकी घेतली.
विरोधकांनी विधिमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडावेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत. लोकायुक्त विधेयक मंजुरीसाठी त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पत्रकार वारिशे यांच्या हत्येची चौकशी सुरू असून संजय राऊत यांना आलेल्या धमकीच्या तक्रारीचीही चौकशी करण्यात येत आहे, पण काही लाेक सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्य करतात, असा टोला त्यांनी लगावला. कसबा, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आम्ही एकत्र गेलो याची पोटदुखी अजित पवार यांना होत असल्याने ते आरोप करीत असल्याचे फडणवीस म्हणाले.
सावरकरांवरील टीकेवर ठाकरे गप्प का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रायपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या टीकेबाबत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केला. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे. आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. मागच्या काळात ठाकरेंची मजबुरी होती. त्यांना सरकार चालवायचे होते. त्यामुळे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करायचे तरी ठाकरे मूग गिळून बसायचे. मात्र आता तुमची काय मजबुरी आहे?, असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला.