लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी गणेश मंडळांची क्षमता मतदार जागृतीसाठी उपयुक्त ठरेल, हे लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यासंर्दभात माहिती दिली.
निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा, यासाठी मतदार शिक्षण, प्रशिक्षण आवश्यक असून, या बाबीकडे निवडणूक आयोगाने ‘सिस्टेमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्टोरल पार्टीसिपेशन’ (स्वीप) कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत केले आहे. मतदार नोंदणी आणि नोंदणी झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आयोगाचा भर आहे.
गणेश मंडळांनी सामाजिक जाणिवेतून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मतदार जागृतीचा चांगला संदेश जनतेपर्यंत जाऊ शकेल, हे ओळखून आम्ही ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ हा उपक्रम आखला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक बंधने पाळत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये ‘घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा’ आयोजित केली जाणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासह सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीप सल्लागार दिलीप शिंदे, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर उपस्थित होते.
प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नावनोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही मतदानाविषयी जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच मतदार नावनोंदणी आणि वगळणी यासाठी प्रसार-प्रचार केला जाईल, असे देशपांडे यांनी सांगितले.