विमानतळावर फार्मा कार्गो हाताळणीची क्षमता देशात होणार सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:21 AM2020-01-04T04:21:28+5:302020-01-04T04:21:43+5:30
आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढविणार, विमानतळ प्रशासनाचे उद्दिष्ट
मुंबई : मुंबई विमानतळावरून सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ करून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचा निर्धार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे करण्यात आला आहे. रशिया, चीनसह किमान ७ आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मुंबईतून थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे २०२० साठीचे उद्दिष्ट आहे.
सध्या मुंबई विमानतळावरून ४७ आंतरराष्ट्रीय ठिकाणी, तर ६१ देशांतर्गत ठिकाणी विविध हवाई वाहतूक कंपन्यांद्वारे उड्डाणे केली जातात. यामध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. २०१८-१९ मध्ये मुंबई विमानतळावरून ४ कोटी ८८ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यानंतर, विमानतळाची प्रवासी वाहतुकीची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
फार्मास्युटिकल कंपनीच्या साहित्याची ने-आण करण्यासाठी विमानतळावर गतवर्षी तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेली वाहतूक व्यवस्था पुरविण्यास प्रारंभ केला आहे. देशातील सर्वात मोठी, विमानतळावरील फार्मा मालवाहतूक हाताळण्याची क्षमता मुंबई विमानतळावर तयार करण्यात येत असून, या माध्यमातून २०२० मध्ये ४ लाख ५० हजार टन फार्मा साहित्याची ने-आण करण्याची क्षमता निर्माण करण्यात येईल. मालवाहतूक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुविधा पुरविण्यासाठी पेमेंट गेटवे, व्हेइकल स्लॉट मॅनेजमेंट, आॅनलाइन डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये सुधारणा करण्यात येत आहे.
प्रवाशांना विमानतळाबाहेर निघण्यासाठी स्वत: आरक्षित करता येईल, अशा टॅक्सी आरक्षण पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येईल. यात सुरक्षेसाठी वाहनचालक, प्रवासी यांचे छायाचित्र, वाहन नोंदणी क्रमांक यांची नोंद करून आरक्षणाच्या पावतीवर चालकाचे छायाचित्र व अन्य माहिती देण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.