Join us

कांजूरमार्ग येथील लस साठा केंद्रात दीड कोटी लस साठविण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कांजूरमार्ग पूर्व येथील लस साठा केंद्राची दीड कोटी लस साठविण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्पुतनिक, कोविशिल्ड ...

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कांजूरमार्ग पूर्व येथील लस साठा केंद्राची दीड कोटी लस साठविण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्पुतनिक, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या तिन्ही लस साठविण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्येक लसीकरिता ठराविक तापमानाची गरज आहे.

कांजूरमार्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे साठवणूक केंद्र असून, यासाठी ४.५ कोटींचा निधी लागला आहे. या केंद्रात दोन वाॅक इन कूलर असून, यांचे तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस ठेवता येते. सध्या या लस साठवणूक केंद्रात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस ठेवण्यात आली आहे. या केंद्रामधूनच शहर, पश्चिम व पूर्व विभागातील लसीकरण केंद्रात लसीचा पुरवठा करणे सुलभ होत आहे.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, लसीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी मुंबईत भांडूप आणि कांजुरमार्गव्यतिरिक्त आणखी एका जागेची निवड लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातला निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल. सध्या कांजूरमार्ग येथील दोन वाॅक इन कूलरमध्ये प्रत्येकी साठ लाख डोस ठेवण्यात येत आहेत. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते यात ९० लाखांपर्यंत डोस ठेवता येऊ शकतात. लवकरच रशियातील स्पुतनिक लसही या साठवणूक केंद्रात ठेवण्यात येणार असून, याचे तापमान -१७ डिग्री ठेवावे लागणार आहे. स्पुतनिक लसीचे पॅकेजिंग कसे आहे, याविषयी माहिती नाही, परंतु सध्या येथील व्यवस्थेत या लसीचेही साठवण शक्य आहे.

केवळ ३० हजार डोस शिल्लक

मुंबई महानगरपालिकेकडे लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रविवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले. सध्या पालिकेकडे केवळ ३० हजार डोस शिल्लक आहेत. राज्य शासनाकडून कमी साठा मिळाला होता. यापूर्वी अखेरीस ७० हजार डोस उपलब्ध झाले होते. तर दुसरीकडे राज्य शासनाला शुक्रवारी १.२ लाख लसीचे डोस मिळाले आहेत, लसीच्या तुटवड्यामुळे ही प्रक्रिया कासवगतीने सुरु आहे. महिनाभरापूर्वी राज्यात दिवसाला चार लाख डोस देण्यात आले होते.