Join us

परळ येथे तीन लाख लसी साठविण्याची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांजूरमार्ग येथे कोरोनावरील लसीसाठी सेंट्रल कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था करण्यात येत आहे. तोपर्यंत एफ दक्षिण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांजूरमार्ग येथे कोरोनावरील लसीसाठी सेंट्रल कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था करण्यात येत आहे. तोपर्यंत एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या तळमजल्यावर कोल्ड स्टोअरेजसाठी २२५ लिटर क्षमतेचे आठ आइसलाइन रेफ्रिजरेटर ठेवण्यात आले आहेत. यातील पाच कार्यरत झाले असून प्रत्येकाची लस स्टोअरेजची क्षमता ६२ हजार ५५० आहे. म्हणजेच तीन लाख १२ हजार लसींची साठवणूक करता येईल. त्यामुळे लसींच्या साठवणुकीची कोणतीही चिंता नसल्याचेही अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

येत्या शनिवार (दि. १६) पासून लसीकरण सुरू होत असल्याने लसीकरणासाठी चार वैद्यकीय महाविद्यालयांत ८० जणांचे, तर उपनगरीय रुग्णालयात ३४ जणांचे पथक असेल. वांद्रे कुर्ला संकुलात ३० बूथ असतील. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पालिकेने केले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी आणखी तीन जम्बो कोविड फॅसिलिटी सेंटर, दोन विशेष रुग्णालये, नऊ सर्वसाधारण रुग्णालये, १४ प्रसूतिगृह आणि ४३ दवाखान्यांमध्ये लसीकरण करता येईल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात दररोज २४ हजार जणांना लस देता येईल, असे भिडे यांनी सांगितले. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या नियोजनाचे निर्देश केंद्र सरकारकडून अद्याप आले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात दोन लाख फ्रन्टलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. यामध्ये ‘एसडब्ल्यूएम’ कर्मचारी, पोलिसांना लस दिली जाणार असून पोर्टलवर ९९ हजारचा डाटा अपलोडही झाला आहे.

* २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस

लसीकरणासाठी १८ मास्टर ट्रेनर्स, १४५२ स्टाफ नर्स, २३५७ इतर सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या ठिकाणी लस घेणाऱ्याला काही त्रास झाल्यास खबरदारी म्हणून हृदयविकार, स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉक्टरांची टीम असेल. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जाईल. ज्याचा रिमाइंडर लाभार्थ्यांना पोर्टलवरून स्वयंचलित पद्धतीने मिळेल.

......................................