लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यात उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेईकल, सेमी कंडक्टर चिप, फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. या उद्योगांमुळे कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागांत २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आय. एस. चहल, प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे बैठकीस हजर होते.
मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक गुंतवणूक
मंगळवारी मंजूर झालेल्या एकूण ८१,१६७ कोटी गुंतवणूक आणि २३,१३६ रोजगाराच्या संधींपैकी ७५,६३२ कोटी रुपयांची गुंतवणूक व १९,००० रोजगाराच्या संधी विदर्भ आणि मराठवाड्यात निर्माण होतील.
कुठे किती गुंतवणूक?
नागपूर (३ प्रकल्प) आणि पनवेल ४० हजार ४३२ कोटी
छत्रपती संभाजीनगर २७ हजार २०० कोटी
तळोजा (नवी मुंबई) आणि पुणे १२ हजार कोटी
रत्नागिरी १,५०० कोटी