कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:12+5:302021-05-22T04:07:12+5:30

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश; राज्य कामगार आयुक्तालयाकडून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोझीकोडे विमान दुर्घटनेवेळी आपल्या प्राणाची ...

Captain Deepak Sathe's family will get immediate relief | कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार

कॅप्टन दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदतनिधी मिळणार

Next

‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश; राज्य कामगार आयुक्तालयाकडून नोडल अधिकाऱ्याची नेमणूक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोझीकोडे विमान दुर्घटनेवेळी आपल्या प्राणाची बाजी लावून जवळपास १७२ प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या मराठमोळ्या कॅ. दीपक साठे यांच्या कुटुंबीयांना आता त्यांच्या हक्काचा मदतनिधी मिळणार आहे. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर त्यांना कम्पान्सेशनची रक्कम मिळवून देण्यासाठी सहायक आयुक्त दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. केवळ एका दिवसातच नियुक्तीसाठी प्रक्रिया पूर्ण झाली.

मुसळधार पावसात दृश्यमानता कमी असल्याने टेबल रनवेवर उतरताना विमान धावपट्टीपुढील खोलगट भागात कोसळले. ७ ऑगस्ट २०२० रोजी केरळच्या कोझीकोडे विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला हा अपघात झाला होता. कॅ. साठे यांनी आपला अनुभव आणि कसब पणाला लावून १९० प्रवाशांपैकी १७२ प्रवाशांचा जीव वाचवला. ते स्वतः मात्र या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या कर्तृत्वाची दखल घेत केरळ सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांचा मदतनिधी जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनमुळे केरळला जाणे शक्य नसल्याने रक्कम महाराष्ट्र राज्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती साठे कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार केरळ सरकारने कम्पान्सेशन कमिशनरकडे ही रक्कम ३ मार्चला पाठविली.

परंतु, सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारूनही हक्काची मदत मिळत नसल्याची खंत दीपक साठे यांच्या मुलाने ट्वीटरद्वारे व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केंद्रीय कामगार आयुक्त, राज्य कामगार आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा कानावर ही बाब घातली. राज्य कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याची दखल घेत आपल्या अधिकाऱ्यांना प्रकरणाची तत्काळ शहानिशा करण्याचे आदेश दिले.

राज्य कामगार आयुक्तालयातील उपआयुक्त आणि सहायक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी एअर इंडिया आणि संबंधित यंत्रणांशी तत्काळ संपर्क केला. केरळ सरकारने मदतनिधी कम्पान्सेशन कमिशनरकडे पाठविल्याची माहिती त्यांना मिळाली. हा विभाग कामगार कोर्टाच्या अखत्यारित येतो. परंतु, साठे यांच्या कुटुंबीयांची आणखी फरफट होऊ नये, यासाठी राज्य कामगार आयुक्तांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे, अशी माहिती कामगार उपआयुक्त भास्कर मोरडे यांनी दिली.

.............

हा विषय राज्य कामगार आयुक्तालयाच्या अखत्यारित येत नाही. मात्र, साठे कुटुंबीयांची मदत करावी या उद्देशाने आयुक्तांनी मला या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली आहे. त्यानुसार कम्पान्सेशन कमिशनरकडे पाठपुरावा केला जाईल.

- नीलांबरी भोसले, नोडल अधिकारी

Web Title: Captain Deepak Sathe's family will get immediate relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.