मुंबईतल्या कुर्ला सिग्नलजवळील भुयारी मार्गांवर गर्दुल्ल्यांचा कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:27 PM2017-11-15T22:27:37+5:302017-11-15T22:28:24+5:30
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या कुर्ला सिग्नलजवळील भुयारी मार्गाचा गर्दुल्ले, मद्यपी आणि भिका-यांकडून गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या कुर्ला सिग्नलजवळील भुयारी मार्गाचा गर्दुल्ले, मद्यपी आणि भिका-यांकडून गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या भुयारी मार्गाचे लोकार्पण झालेले नाही. भुयारी मार्गात पावसाळ्यात पाणी साचले आहे. गेल्या पाच महिन्यांपसून साचलेल्या पाण्यात डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १२ वर्षांपुर्वी हा भुयारी मार्ग बांधण्यात आला होता. परंतु अद्याप हा मार्ग रहिवाशांसाठी खुला करण्यात आला नाही. भुयारी मार्गाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी शटर लावलेले असून, त्यावर कुलूपही लावलेले आहे. गर्दुल्ल्यांनी या मार्गावरील खिडक्यांचे लोखंडी गज तोडून खिडक्यांमधून येण्या-जाण्याचा रस्ता तयार केला आहे. गर्दुल्ले महिलांशी गैरवर्तणूक करून, रात्रीच्या वेळी एकट्या पदचा-याला लुटून पळून जातात आणि या भुयारात जाऊन लपतात असेही स्थानिकांनी सांगितले.