१९ लाखांचे कॅमेरे हस्तगत
By Admin | Published: April 12, 2015 12:14 AM2015-04-12T00:14:47+5:302015-04-12T00:14:47+5:30
भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भरतकुमार भटकडून सायन पोलिसांनी १९ लाख किमतीचे कॅमेरे हस्तगत केले आहेत.
मुंबई : एका चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याची बतावणी करून चॅनेलसाठी जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर महागडे कॅमेरे देणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भरतकुमार भटकडून सायन पोलिसांनी १९ लाख किमतीचे कॅमेरे हस्तगत केले आहेत.
मूळचा गुजरातच्या कच्छमधील रहिवासी असलेला भट हा कुटुंबासह विलेपार्ले येथे राहण्यास होता. मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने एका तरुणीशी प्रेमविवाह केला. पत्नीला घेऊन वेगळे राहण्याच्या हट्टापोटी कुंचीकुर्वे टोळीकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी भटने डिस्कव्हरी
चॅनेलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर असल्याचे सांगून जंगलात शूटिंग करण्याच्या बहाण्याने भाडेतत्त्वावर कॅमेरे घेतले.
हे कॅमेरे विकून कर्ज फेडण्याचा कट त्याने आखला होता. मात्र त्याचे बिंग फुटले आणि त्याला अटक झाली. चौकशीत त्याने मुंबईत राहणाऱ्या मित्राकडे कॅमेरे ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार सायन पोलिसांनी मित्राच्या घरून सुमारे १९ लाख किमतीचे कॅमेरे हस्तगत केले. (प्रतिनिधी)