मुंबई : जवळपास अडीच कोटी रुपयांच्या बेकायदेशीर रक्तचंदनासह दोघांच्या मुसक्या गुरुवारी आवळण्यात आल्या. ही कारवाई गुरुवारी रात्री अंबोली पोलिसांनी केली. यातील आणखी काही पसार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
एजाज सय्यद (३१) आणि सुफियान शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते दोघे मुंबईत डोंगरी परिसरात राहतात. अंधेरीच्या वीरा देसाई मार्ग परिसरात काही जण मोठ्या प्रमाणात रक्तचंदन घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक कापसे आणि पथकाने तसेच वन परिमंडळ अधिकारी समीर इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास श्यामनगर परिसरात सापळा रचला. त्या वेळी एक टेम्पो तेथे आला.
टेम्पोतील लोकांचे वागणे संशयास्पद वाटल्याने टेम्पो थांबवत झडती घेण्यात आली. तेव्हा त्यात ९ सफेद पिशव्यांमध्ये ५०० किलो ४६५ ग्रॅम वजनाचे रक्तचंदन सापडले. याची बाजारपेठेतील किंमत २ कोटी ५० लाख रुपये असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी सय्यद आणि शेख यांना अटक करण्यात आली. टेम्पोचालक सनी फ्रान्सिस यालाही ताब्यात घेत पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र त्याचा यात काही सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले.