चार लाखांचे एमडी हस्तगत
By admin | Published: January 13, 2015 01:22 AM2015-01-13T01:22:03+5:302015-01-13T01:22:03+5:30
अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत ड्रग विक्रेत्याला रविवारी नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ हस्तगत केले आहे.
कुर्ला : अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका सराईत ड्रग विक्रेत्याला रविवारी नेहरूनगर पोलिसांनी अटक केली. या आरोपीकडून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ हस्तगत केले आहे.
एमडीची विक्री रोखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या परिसरांमध्ये विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्या ठिकाणी अधिक गस्त वाढवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये शहरात अनेक ठिकाणी छापेमारी करीत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. शिवाय अनेक विक्रेत्यांनाही अटक केली आहे.
नेहरूनगर परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती नेहरूनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत मुस्ताकीन खान (३०) या आरोपीला ताब्यात घेतले. झडतीत पोलिसांना ४८ ग्रॅम एमडी आढळले. याची बाजारभाव किंमत सुमारे चार लाख रुपये आहे. पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली असून, यात आणखी काही सहभागी असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)