मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांचा थेट संबंध सनातन प्रभात आणि हिंदू जनजागृती समिती या संघटनांसोबत आढळला आहे. त्यामुळे या संस्थांवर बंदी घालून राज्य सरकारने तत्काळ संस्था प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी पत्रकार निखिल वागळे यांनी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी भारत बचाव आंदोलन संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत वागळे बोलत होते.ते म्हणाले, हिंदूंच्या नावावर दहशतवादी कारवाया करणारे हिंदूंचा अपमान करीत आहेत. मडगाव, ठाणे अशा विविध प्रकरणांत या संघटनांचा दहशतवादी कारवायांत थेट संबंध स्पष्ट झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून ते मार्गी लावण्याचे काम सरकारने करायला हवे. राज्यभर सुरू असलेल्या अटकसत्रांमुळे याआधी मारेकरी म्हणून अटक केलेल्या वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांच्या अटकेबाबत संशयाला जागा उरते.कारण आता अटक केलेल्या आरोपींच्या घरात पिस्तूल सापडले आहे. असे असेल, तर मग तावडे आणि अकोलकर यांना कोणत्या आधारावर अटक करण्यात आली होती, या प्रश्नाचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. हिंदू विधिज्ञ परिषदेतील वकिलांसह प्रवक्त्यांचीही चौकशी करण्याची गरज वागळे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई म्हणाले, याआधीही राज्यातील बॉम्बस्फोट प्रकरणांत सनातनचा थेट संबंध आढळलेला आहे.
चौकशीसाठी जयंत आठवलेंना ताब्यात घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 5:20 AM