साडेचार लाख रुपये हस्तगत केले...
By admin | Published: July 5, 2016 01:41 AM2016-07-05T01:41:04+5:302016-07-05T01:41:04+5:30
चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या खासगी वित्त कंपनीवर दरोडा टाकल्यानंतर वाट्याला आलेल्या रकमेपैकी साडेचार लाख रुपये मयूर कदम याने भिवंडीच्या बिल्डरकडे घरखरेदीकरिता दिले होते
ठाणे : चेकमेट सर्व्हिसेस प्रा.लि. या खासगी वित्त कंपनीवर दरोडा टाकल्यानंतर वाट्याला आलेल्या रकमेपैकी साडेचार लाख रुपये मयूर कदम याने भिवंडीच्या बिल्डरकडे घरखरेदीकरिता दिले होते. त्या रोख रकमेसह नाशिकमधील एका फरार आरोपीच्या घरातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने ४७ लाखांची रोकड हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट युनिट क्रमांक-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी यांच्या पथकाने नाशिकमधील या टोळीतील फरार आरोपींच्या घरी सोमवारी धाड टाकली.
त्या वेळी ४७ लाखांची रोकड या पथकाच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या आरोपींच्या नातेवाइकांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, त्या फरार आरोपीने अद्याप घरी संपर्क साधला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. (प्रतिनिधी)
घरासाठी भरले होते पैसे
टोळीतील मयूरने दरोड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जून रोजी भिवंडीतील एका बिल्डरकडे घरखरेदीकरिता साडेचार लाखांची रोकड भरली होती. ही माहिती मिळाल्यानंतर सोमवारी संबंधित बिल्डरकडून ती रक्कमही हस्तगत करण्यात आली. आतापर्यंत नऊ कोटी रुपयांच्या या दरोड्यातील सुमारे सात कोटी रुपये हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले.