Join us

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडली स्फोटके असलेली गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

गुन्हे शाखेकडून तपास सुरू : कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी ...

गुन्हे शाखेकडून तपास सुरू : कारमध्ये जिलेटिनच्या २० कांड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर २० जिलेटिनच्या कांड्या असलेली संशयास्पद स्कॉर्पिओ कार सापडल्याने गुरुवारी खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

अंबानी यांच्या पेडर रोडलगत असलेल्या अँटिलिया निवासस्थानाजवळ संशयास्पद वाहन उभे असल्याची माहिती पोलिसांना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मिळाली. घटनेची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, फॉरेन्सिक पथक तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास केल्यानंतर वाहनात जिलेटिनच्या २० कांड्या मिळाल्या. अंबानी यांच्या बंगल्यापासून जवळच हे वाहन उभे होते.

पोलिसांकडून अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या गाडीमध्ये धमकीची चिठ्ठी असल्याचे समजते. मात्र, याला पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. गुन्हे शाखा याबाबत अधिक तपास करीत आहे. बुधवारी मध्यरात्री ही गाडी तेथे आल्याची माहिती मिळते आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने गुन्हे शाखा त्याची खातरजमा करीत आहे.

कारचा क्रमांक सारखाच?

अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचे सांगितले जात आहे. याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

चौकशी सुरू

संशयास्पद वाहन ताब्यात घेतलेले आहे. त्यात जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या. स्फोट होण्यासाठी त्या एकत्रित जोडलेल्या नव्हत्या. अधिक तपास सुरू आहे.

- चैतन्या एस., पोलीस प्रवक्ते, मुंबई पोलीस

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अल्टामाऊंट रोडवरील घरापासून काही अंतरावर एका गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत. मुंबई पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत.

- अनिल देशमुख, गृहमंत्री

उच्चभ्रू वस्तीचा परिसर

अल्टामाऊंट रोड आणि लगतचा पेडर रोड हा उच्चभ्रू वस्ती असलेला परिसर आहे. तेथे उद्योगपती, सनदी अधिकारी यांच्यासह काही मंत्र्यांचे बंगले आहेत. अशा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर स्फोटके असलेली गाडी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री गाडी उभी केली

बुधवारी रात्री उशिरा तिथे गाडी उभी करण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास या गाडीचा ताबा पोलिसांनी घेतला. मग, मोठा फौजफाटा येथे आला. या गाडीत काही स्फोटके होती आणि गाडीत वेगवेगळ्या नंबरप्लेटही पोलिसांना सापडल्या. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीप्रमाणे, तिथे दोन गाड्या आल्या होत्या. दुसऱ्या गाडीबाबत अद्याप माहिती समजलेली नाही.