वांद्र्यात भंगार गाड्यांना, तर कामाठीपुऱ्यात इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 09:58 AM2024-02-07T09:58:23+5:302024-02-07T09:59:50+5:30
माेठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता.
मुंबई : ग्रँट रोड परिसरातील कामाठीपुरा येथे एका इमारतीत तर वांद्रे परिसरात १५० भंगार गाड्यांना मंगळवारी आग लागली. या घटनांमध्ये कुठल्याही प्रकार जीवितहानी झालेली नाही. मात्र, यात मोठ्या प्रमाणत वित्तहानी झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
कामाठीपुऱ्यात इमारतीला सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आग लागताच रहिवाशांनी पळ काढला. दुसऱ्या मजल्यावरील २ रूममध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, घरातील सामान, अन्य विजेच्या उपकरणांमुळे आग पसरल्याची प्राथमिक माहिती जवानांनी दिली.
आगीचे कारण अस्पष्ट :
दुसरीकडे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वांद्रे पूर्व येथील टीचर्स कॉलनीच्या मागे असलेल्या १०० ते १५० भंगार गाड्यांना आग लागली.
पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान लागलीच घटनास्थळी पोहोचले. आगीचे प्राथमिक कारण अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकराची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
हे मुंबई अग्निशमन दलाकडून लेव्हल १ ची आग म्हणून घोषित करण्यात आली आणि आग विझविण्यासाठी १००० चौरस फूट परिसरात एक होस लाइन वापरण्यात आले.