स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील दहीसर पूर्व अशोकवन परिसरात असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या (shivsena MLA Prakash Surve) यांच्या कार्यालयाबाहेर फटाक्यांनी भरलेली एक गाडी आढळून आली आहे. या घटनेची माहिती समजताच त्वरित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल तपास सुरू केला आहे.
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अशोकवन येथील कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून टाटा सुमो ही गाडी पार्क करण्यात आली होती. परंतु कार्यालयातील काही जणांना संशय आल्यानंतर त्यांनी या गाडीची पाहणी केली. त्यानंतर यात काही असल्याचं समजताच पोलिसांना त्वरित या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान, या गाडीत बॉक्समध्ये फटाके भरले असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, हा घातपाताचाही प्रकार अशू शकतो, असा संशय प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केला.
पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली असून संबंधित गाडीच्या मालकाची ओळख पटली आहे. तो जवळच्याच इमारतीत राहतो आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी, चौकशी केली असता, आपण रस्त्यावर फटाके विकतो आणि पावसामुळे आपण ते आपल्या गाडीतच ठेवले होते, असा दावा गाडी मालकाने केला आहे. तसेच, यासंदर्भात आम्ही सर्व कंगोऱ्यांनी तपास करू आणि त्यानुसार कारवाई करू, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
"गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही गाडी या ठिकाणी उभी होती. उद्या स्वातंत्र्यदिन आहे. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला असता तर कोण जबाबदार राहिलं असतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी," अशी प्रतिक्रिया प्रकाश सुर्वे यांनी दिली.