Join us

शिकण्यासाठी गाडी काढली अन् बघता बघता चिखलाच्या दलदलीत अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 8:20 PM

सुदैवाने शिकणाऱ्या व शिकवणाऱ्या तरुणांना कुठलीही इजा झालेली नाही

आशिष राणे

वसई - वसई पश्चिमेला  चारचाकी वाहन शिकण्यासाठी नेलेली गाडी चक्क चिखलाच्या दलदलीत अडकल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि २४) जानेवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास  सनसिटी- गास रस्त्याच्या कडेला असलेल्या  मोकळ्या मैदानात घडली आहे. नशीब बलवत्तर म्हणून या गाडीतील चार ते पाच तरुणांना काही इजा झाली नाही मात्र या नव्या कोऱ्या चारचाकी गाडीचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि २४ जानेवारी च्या भल्या पहाटे ५ च्या सुमारास वसईतील चार ते पाच तरुण  गाडी शिकण्यासाठी सनसिटी गास रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानावर गेले असता गाडी चालवताना चक्क ही गाडी तेथील चिखलातल्या दलदलीत रुतून बसली. दरम्यान गाडी चिखलात रुतून बसल्यानंतर या तरुणांनी ही गाडी तेथून बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले प्रसंगी एक क्रेन ही मागवली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

परिणामी या तरूणांनी वैतागून अखेर जवळच असलेल्या सनसिटी येथील पालिकेच्या फायर स्टेशनला  वर्दी दिली असता तात्काळ अग्निशमन दलाचे जवान त्याठिकाणी आल्यावर त्यांनी मोठया दोरीच्या सहाय्याने या गाडीला बाहेर खेचून काढण्यात त्यांना यश आले मात्र या सर्व शर्तीच्या प्रयत्नात गाडीचे मात्र बऱ्यापैकी नुकसान झाले आहे परंतु त्या शिकणाऱ्या व शिकवणाऱ्या तरुणांना कुठलीही इजा झालेली नाही असे अग्निशमन विभागाने सांगितले.

मागील चार महिन्यांत पडलेला दमदार पाऊस व अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसाने येथील जमिनीत अजूनही नरमाई आहे तर हा संपूर्ण पट्टा खारटण भागात मोडत  असल्याने आता यापूढे नागरिकांनी याठिकाणी गाडी फिरवताना किंवा शिकताना जरा सावधानता बाळगावी असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे.

टॅग्स :मुंबईकार