मढ/आळेफाटा (पुणे) : माळशेज घाटातील धबधब्याजवळ रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.हेमंत लक्ष्मण तनपुरे (३२, रा. हिंगणे खुर्द, पुणे) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. तुषार हनुमंत गायकवाड, विश्वजीत दत्तात्रय जगताप (दोघेही, रा. हिंगणे खुर्द, पुणे) हे दोघे जखमी झाले.आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत तनपुरे त्याचे मित्र केतन कैलास हगवणे, तुषार हनुमंत गायकवाड, विश्वजीत दत्तात्रय जगताप यांच्यासोबत पुण्याहून माळशेज घाटात फिरायला आले होते. घाटातील मंदिरापासून काही अंतरावर गाडी बाजूला लावून ते पावसात भिजण्याचा आनंद लुटत असताना अचानक दरड पडली. त्यात हेमंत गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गाडीचेही नुकसान झाले. माळशेज घाटात पर्यटनासाठी आलेल्या हडपसर येथील संतोष भिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी हेमंतला मढमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्याला पुढील उपचारांसाठी आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याआधी रविवारी (१४ जून) माळशेज घाटात खासगी बसवर दरड कोसळून दोन प्रवासी ठार झाले होते. (प्रतिनिधी) ----------माळशेज घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतात. अनेक वेळा हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवला जातो. डोंगरांवरून कोसळणाऱ्या जलप्रपातांचा अनुभव घेण्यासाठी पावसात पर्यटकांची गर्दी होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मोटारीवर दरड कोसळली; एका पर्यटकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2015 2:52 AM