गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - अक्सा समुद्रकिनारी शनिवारी संध्याकाळी सहलीसाठी गेलेल्या सहा तरुणांनी केलेला स्टंट त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतला. गाडी पलटून तो खाली चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला तर अन्य जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास अक्सा बीचवर घडली.
कार क्रमांक (MH-02-DK-1524 ) ही 60 किलोमीटर वेगाने पळवत तरुण स्टंट करत होते, काही फूटबोर्डवर लटकत होते आणि इतर दोघे कारच्या खिडकीवर बसले होते. प्रत्यक्षदर्शी नील कोएल्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मी १५ मुलांसह अक्सा समुद्रकिनाऱ्यावर काही ऍक्टिव्हिटीसाठी आलो होतो. तेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून बीचवर एक वेगाने किनाऱ्यावर आली. चालकाने ती अचानक उजवीकडे वळवली त्यामुळे ती वाळूवर उलटी झाली. त्यामुळे फूटबोर्डवर उभ्या व्यक्तीला गाडीने चिरडले.
जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना गाडीखाली काढून शताब्दी रुग्णालयात दाखल केले. कार खूप वेगात असताना ते स्टंट करत होते. समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना परवानगी नाही तरी हे तरुण बीचमध्ये कसे घुसले याची चौकशी करत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असेही कोएल्हो म्हणाले. "किनाऱ्यांवर कारला बंदी आहे, पण ही कार समुद्रकिनाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलेली बोलेरो कार होती ज्यात २५ ते ३० वयोगटातील सहा तरुण होते, ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.