‘...तर हवेतील कार्बनचे प्रमाण २०२५ पर्यंत ६० टक्क्यांपर्यंत जाईल!’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:18 AM2019-02-08T06:18:55+5:302019-02-08T06:19:12+5:30
हवेतील कार्बनचे प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत वाढले असून अशाच प्रकारे इंधनाचा वापर राहिल्यास २०२५ पर्यंत कार्बनचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती भारत पेट्रोलियमचे महाप्रबंधक व इंधन वाचवा मोहिमेचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई - हवेतील कार्बनचे प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत वाढले असून अशाच प्रकारे इंधनाचा वापर राहिल्यास २०२५ पर्यंत कार्बनचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती भारत पेट्रोलियमचे महाप्रबंधक व इंधन वाचवा मोहिमेचे राज्य समन्वयक संतोष निवेंडकर यांनी व्यक्त केली आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इंधन वाचले, तर देशाची आर्थिक स्थिती आणि पर्यावरण या दोन्हींची बचत होईल, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, कच्च्या तेलाच्या आयातीसाठी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार येत आहे. त्यात हवेतील कार्बनच्या वाढत्या परिणामामुळे हवेने धोक्याची पातळी ओलांडल्याचा अहवालही संयुक्त राष्ट्र संघात पर्यावरण संघटनांनी सादर केला आहे. प्रदूषणामुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहता, प्रत्येकाने इंधन बचतीला प्राधान्य देणे देशाची गरज झाले आहे.
सिग्नलवर वाहन जास्त वेळ उभे असताना वाहनाचा मेन स्विच बंद न करणे, वाहन चालकाने गाडीत एसी लावून झोपणे अशा विविध कारणांमुळे इंधनाचा अपव्यय होत आहे. परिणामी, भविष्यात इंधनाची समस्या व पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याबाबतच जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय तेल कंपन्यांनी ‘इंधन वाचवा, देश वाचवा’ अशी मोहीम हाती घेतल्याचे निवेंडकर यांनी सांगितले. या मोहिमेत देशातील शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, एस.टी. डेपो, पेट्रोल पंप अशा विविध ठिकाणी लोकांना इंधनाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
देशात वापरण्यात येणाऱ्या एकूण इंधनापैकी ८० टक्के इंधन हे आयात केलेले, तर २० टक्के इंधन देशांतर्गत निर्मिती झालेले आहे. त्यामुळे जनतेने या विषयाकडे गांभीर्याने पाहावे, असे ते म्हणाले.