Join us

एटीएम सेंटरमध्येच कार्डची अदलाबदल

By मनीषा म्हात्रे | Published: March 03, 2024 7:53 PM

एटीएम सेंटरमध्येच पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका ठगाने डेबिट कार्डची अदलाबदल केल्याचा प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे.

मुंबई: एटीएम सेंटरमध्येच पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका ठगाने डेबिट कार्डची अदलाबदल केल्याचा प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. मालाड येथील रहिवासी असलेले कृष्णकांत सोमनाथ सिंग (३८) यांच्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता घर खर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्याने ते पैसे काढण्यासाठी मालाड स्टेशन रोड परिसरातील एटीएममध्ये गेले. 

एटीएममध्ये मी पैसे काढण्याकरीता डेबीट कार्ड टाकले व पीनकोड क्रमांक टाकत असताना पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने लवकर पैसे काढण्याच्या सूचना दिल्या. बोलण्याच्या नादात चुकीचा पिनकोड टाकल्याने पैसे निघाले नाही. पाठीमागे उभ्या असणाऱ्या व्यक्तीने पैसे काढण्यास मदत करतो सांगून डेबिट कार्ड हातात घेतले. काही वेळाने एटीएममध्ये पैसे नाही म्हणत एक डेबिट कार्ड सोपवून निघून गेला. 

पैसे निघत नसल्याने बँकेत चौकशी करताच माझ्याकडील एटीएम कार्ड वेगळे असल्याचे समजले. डेबिट कार्ड बाबत गोंधळ सुरु असताना, काही वेळातच खात्यातून ७ हजार रुपये काढल्याचा संदेश आला. त्यांनी, तात्काळ बँक कर्मचाऱ्यांना याबाबत कळवले. एटीएम सेंटरमधील पाठीमागे उभ्या आलेल्या व्यक्तीने हातचलाखीने डेबिट कार्ड बदलून फसवणूक केल्याची खात्री होताच, त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

टॅग्स :मुंबईएटीएम