मुंबई : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून तोंडावर मास्क लावण्याचा नियम हा आरोग्यासाठी आहे की क्लीन अप मार्शलच्या ठेकेदारांच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी, असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मास्कच्या नावाखाली क्लीन अप मार्शलकडून होणारी दमदाटी, नागरिकांनी प्रश्न विचारले तर थेट सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या नावाखाली तीन महिने तुरूंगात टाकण्याची धमकी आणि अरेरावीच्या भाषेने नागरिक त्रस्त आहेत.लोकल सेवा अद्याप बंद असल्याने कामधंद्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर नागरिक बस, टॅक्सीमार्गे दादर गाठतात. वाहतूक कोंडीतून वाट काढत किंवा अख्ख्या टिळक पुलावर पायपीट करून प्लाजा सिनेमाजवळील भाई कोतवाल उद्यानाकडे जाणाऱ्या नागरिकांना सध्या क्लीन मार्शल नावाच्या टोळधाडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेचे कर्मचारी असल्याचे भासवत मास्क सक्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वसुलीचे काम सुरू आहे. यात अनेकदा मास्क असणारी मंडळी भरडली जात आहेत. पुल चालून पार केल्यावर जरा श्वास घेत काही काळ मास्क खाली करून जरा दम घेण्याच्या प्रयत्नातील नागरिकाजवळ दबा धरून बसलेले मार्शल लागलीच पोहचुन पावती फाडायला सुरूवात करतात. यावर, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना थेट सरकारी कामात अडथळा आणताय, तुमच्यावर ३५३ लावू मग तीन महिने तुरूंगात जावे लागेल, अशा दमदाटीचा सूर सुरू होतो. वाद सुरू होताच आसपास टवाळक्या करत उभी असलेली ठेकेदाराची इतर माणसेही नागरिकांच्या अंगावर येतात. थेट कराटेत ब्लॅकबेल्ट झाल्याचे ऎकवायलाही कमी करत नाहीत. या साऱ्या प्रकारामुळे नागरिकांना क्लिन अप मार्शल नावाच्या टोळधाडीचा ठिकठिकाणी सामना करावा लागत आहे.
संबंधितांनी मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात आधीच कोरोनाचा काळा आहे, लोक अडचणीत आहेत. या काळात किमान ज्यांच्या तोंडावर मास्क आहे त्यांची अडवणूक होता कामा नये. जाणीवपूर्वक कोणाला टार्गेट करू नये. नागरिकांशी सौजन्याने, नम्रतेने आणि नीट वागणे क्रमप्राप्त आहे. पोलिसांच्या नावाने किंवा महापालिकेच्या नावाने नागरिकांना चुकीची वागणूक देऊ नये. पोलिसांनी संबंधित सर्व मार्शलना यापुर्वीच मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. नियमांची अंमलबजावणी करताना वादाचे प्रसंग होणार नाहीत आणि नागरिकांच्या प्रतिष्ठेची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून वारंवार सूचना दिल्या जातात आजही आम्ही संबंधितांना त्यासाठी बोलावले आहे. - के. एम. कसार, पोलिस निरीक्षक, दादर
महापालिकेची खंडणीखोरी सुरू आहे मार्शलकडून जबरदस्तीने मास्क असतानाही वसुलीच्या तक्रारी रोज येत आहेत. सुरूवातच दोन हजारांच्या दंडाने होते. या आकड्यानेच लोक घाबरत आहेत. मग कधी दमदाटी आणि भांडणाचे प्रकार घडत आहेत. क्लीन अप मार्शल दंडासाठी नव्हे तर खंडणीखोरी करत पैसे गोळा करण्यासाठीच तैनात करण्यात आले आहेत. - संदीप देशपांडे, मनसे