Join us

‘क्यार’ चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळात; किनारपट्टीला मात्र धोका कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:30 AM

वादळ मुंबईपासून ६७० किलोमीटर दूर;

मुंबई : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ नावाच्या चक्रीवादळाचे रूपांतर आता महाचक्रीवादळात झाले आहे. चक्रीवादळ ओमानच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, रविवारी दुपारी एकच्या सुमारास ते पूर्वमध्य अरबी समुद्रावर होते. मुंबईपासून ६७० किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्रीवादळाचा धोका आता टळला असून, गेल्या आठवडाभरापासून मुंबई शहर आणि उपनगरावर दाटून आलेले मळभ रविवारी हटले होते. ‘क्यार’ चक्रीवादळ मुंबईपासून दूर गेले असले तरी महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला असलेला धोका अद्यापही कायम आहे.

हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘क्यार’ चक्रीवादळामुळे समुद्रात ताशी २५० किमी वेगाने वारे वाहत असून, येत्या पाच दिवसांत हे चक्रीवादळ ओमानला धडकेल. दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले असून, चक्रीवादळाचा परिणाम म्हणून २८ आॅक्टोबपर्यंत मालवणपासून वसईच्या समुद्रकिनाºयापर्यंत समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळतील. परिणामी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये. तसेच २८, २९ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. डहाणूपासून मार्मागोव्यापर्यंत समुद्रकिनाºयाला हवामान खात्याने धोक्याच्या इशारा दिला असून, वाºयाचा वेगही २५० किमी राहील. १ नोव्हेंबरनंतरच ही स्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.मुंबईकरांची पावसापासून सुटकारविवारी दिवसभर मुंबईत कडक्याचे ऊन पडल्याने मुंबईकरांची पावसापासून सुटकाही झाली होती. परिणामी मुंबईकरांचा दिवाळीचा पहिलाच दिवस गोड गेला असून, आता येथील पावसाचे प्रमाणही उत्तरोत्तर कमी होणार आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.राज्यासाठी अंदाज२८ ऑक्टोबर : विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२९ ऑक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.३० ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.कमाल तापमानात घटमध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

टॅग्स :क्यार चक्रीवादळ