२२ टक्के रकमेत उद्यानांची देखभाल
By admin | Published: January 23, 2016 03:58 AM2016-01-23T03:58:25+5:302016-01-23T03:58:25+5:30
मैदाने व उद्याने देखभालीसाठी दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणावरून एकीकडे वाद रंगला असताना पालिका प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत़ यामध्ये ठेकेदारांनी
मुंबई : मैदाने व उद्याने देखभालीसाठी दत्तक तत्त्वावर देण्याच्या धोरणावरून एकीकडे वाद रंगला असताना पालिका प्रशासनाने निविदा मागविल्या आहेत़ यामध्ये ठेकेदारांनी तब्बल ६० ते ७८ टक्के कमी दरांमध्ये काम करण्याची तयारी दाखविली आहे़ मात्र २२ टक्के रकमेत देखभाल नव्हे, तर ठेकेदार उद्याने आणि मैदाने भकास करतील, अशी साशंकता व्यक्त होत आहे़
खेळाचे मैदान व उद्यानांसाठी पालिकेने नवीन धोरण आणले आहे़ मात्र भाजपाचा यास विरोध असल्याने पालिकेच्या महासभेत मंजूर झालेले हे धोरण अडचणीत आले आहे़ मुख्यमंत्र्यांनी या धोरणाला स्थगिती दिली आहे़ तत्पूर्वी १५ जानेवारी रोजी खेळाची मैदाने व उद्याने देखभालीकरिता देण्यासाठी निविदा पालिकेने मागविल्या होत्या़ मात्र यात ठेकेदारांनी पालिकेने अंदाजिलेल्या खर्चापेक्षा ६० ते ७८ टक्के कमी दरांमध्ये उद्यानांची देखभाल करण्याची तयारी दाखविली
आहे़ कमी दराच्या निविदा भरून कालांतराने ठेकेदार पालिकेला वाढीव बिले पाठवत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे़ २२ टक्के रकमेत हे ठेकेदार देखभालीचा दर्जा कसा राखणार, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)