लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून, त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज रविवारी ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. या परिषदेत राज्य कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे, असे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले. प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घ्यायला हवी. कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना,’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकांनी आपल्या मनाला विचारणे आवश्यक आहे.दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते. हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे, असे डाॅ. संजय ओक यावेळी म्हणाले. मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून, दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी जोशी यांनी सांगितले.
मुलांनीदेखील नियमांचे पालन करण्याची गरजnपहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनीदेखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन डाॅ. सुहास प्रभू यांनी केले. nशाळा सुरू होण्याअगोदर दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशू व आई यांची काळजी घेतानाच आईला कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.