वृद्धाला अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी, केअर टेकर महिलेसह चार जणांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: January 7, 2024 07:58 PM2024-01-07T19:58:18+5:302024-01-07T19:58:24+5:30
खार पोलिसांची कारवाई
मुंबई: खार परिसरात केअर टेकर महिलेनेच अश्लील रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत साथीदारांच्या मदतीने एका वृद्धाकडून सव्वा दोन लाख रुपये उकळले. अखेर, वृद्धाने सतर्क होत पोलिसांची मदत घेताच खंडणीची रक्कम घेण्यासाठी घरी आलेल्या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकलया आहेत. अनिल सुंदरलाल चौहाण (३२), किरण सोमा नायर (२४) आणि राजेश सिताराम केवट (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मुंबईसह ठाणे, मुंब्रा येथील रहिवासी आहे.
खार परिसरात राहणारे ६३ वर्षीय तक्रारदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मेडिसिनसह बॉडी मसाज, अंघोळीसाठी केअर टेकर महिलेच्या शोधात होते. त्यांनी जस्ट डायलवरून केअर टेकर सर्व्हिसची पाहणी केली. तेव्हा, जनसेवा कल्याण मेड सर्व्हिस मधून त्यांच्याशी संपर्क साधला. २९ डिसेम्बर रोजी नितु भारद्वाज नावाची महिला घरी आली. तिची मुलाखत घेतली तेव्हा ती अशिक्षित असल्याचे दिसले. मेडिसिन बाबत समजणार नाही म्हणून त्यांनी तिला नकार देताच तिने कामाची आवश्यकता असल्याचे सांगून विनंती केली म्हणून नोकरीवर ठेवले.
रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते अमेरिकेतील मैत्रिणीसोबत गप्पा मारायचे. याच दरम्यान रितुने नाना आपको रिलॅक्स करती हू म्हणाली. त्यानंतर ३० तारखेला रात्रीच्या सुमारास झोपेच्या गोळ्या घेतल्या. झोपेत असताना नितु त्यांचे पाय दाबत होती. मात्र दुसऱ्या दिवशी नितु बाबत संशय आल्याने त्यांनी अन्य कामगार महिलेकडे चौकशी केली. तेव्हा, नितु झोपेतून उठली नसल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी तिला एक दिवसाचा पगार देत कामावरून काढले.
त्याच दिवशी साडे अकराच्या सुमारास त्यांना अनोळखी क्रमांकावरून नितुने कॉल आला. तिच्याकडे त्यांचे अश्लील रेकॉर्डिंग असून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत ४० हजारांची मागणी केली. तसेच पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. त्यानंतर नितुचा मॅनेजर अनिल चौहानने कॉल करून धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी आरोपींच्या दबावाला बळी पडून एकूण २ लाख २० हजार रुपये दिले.
अन आरोपी जाळ्यात
पैशांची मागणी वाढत असल्याने अखेर त्यांनी याबाबत खार पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. ठरल्याप्रमाणे नितुला आणखीन ५० हजार रुपये घेण्यासाठी घरी बोलावले. ती साथीदारांसह घरी पोहचताच खार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.