‘क्यार’चा धोका टळला; तरी पाऊस ७ नोव्हेंबरपर्यंत; ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 12:48 AM2019-10-27T00:48:19+5:302019-10-27T00:48:42+5:30
हवामानातील बदलाचा परिणाम
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतरण ‘क्यार’ नावाच्या चक्रीवादळात झाले असून, याचा परिणाम महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात होत आहे. ‘क्यार’ चक्रीवादळामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस झाला असून, मुंबईसह लगतच्या प्रदेशातही पावसाची रिपरिप सुरू आहे. ‘क्यार’ चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून, त्याचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही. सातत्याने हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ आॅक्टोबरपासून सुरू झालेला पावसाचा जोर ३१ आॅक्टोबरपर्यंत कायम राहील. या काळात संपूर्ण दक्षिण भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात पाऊस पडेल. याच काळात पूर्वोत्तर भारतातही पावसाचा जोर कायम राहील. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतात पावसाचा जोर किंचित कमी होईल. महाराष्ट्राचा विचार करता विदर्भात पाऊस ओसरेल; मात्र मध्य महाराष्ट्रासह कोकण प्रदेशात किंचित पडेल. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत मात्र संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण पूर्णत: कमी होईल. परंतु या काळात दक्षिण भारतात ठिकठिकाणी पाऊस कोसळेल. १५ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत हीच परिस्थिती कायम राहील.
मुंबईचा विचार करता शनिवारी सकाळपासून शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण आहे. सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान उपनगरात काही वेळ सरींवर सरी पडल्याचे चित्र होते. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले. दुपारी चारनंतर मध्य मुंबई, विशेषत: दक्षिण मुंबईत दाटून आलेल्या ढगांनी प्रचंड काळोख केला होता. दिवसभर असलेले ढगाळ वातावरण, अधूनमधून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे मुंबईकर त्रस्त होते. दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना तापदायक वातावरणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र होते.
चक्रीवादळ ओमानकडे सरकले
‘क्यार’ चक्रीवादळाचा वेग ताशी बारा किलोमीटर आहे. चक्रीवादळ रत्नागिरीपासून ३०० तर मुंबईवासून ३७० किलोमीटर लांब आहे. ते ओमानकडे सरकले असून, येत्या पाच दिवसांत ते ओमानला धडकेल.
हवामानातील या बदलामुळे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.