Join us  

आवडत्या क्षेत्रात करिअर करा

By admin | Published: February 19, 2015 12:46 AM

तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याच क्षेत्रात करिअर करा. मात्र त्याआधी आपल्या पालकांना पूर्ण कल्पना द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेता पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे याने कॉलेजियन्सला दिला.

मुंबई : आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याच क्षेत्रात करिअर करा. मात्र त्याआधी आपल्या पालकांना पूर्ण कल्पना द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध मराठी अभिनेता पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे याने कॉलेजियन्सला दिला.बोरीवली येथील श्री भाऊसाहेब वर्तक कॉलेजचा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पॅडीने कॉलेज तरुणांशी संवाद साधला. त्याचबरोबर तब्बल ८ वेळा राष्ट्रीय स्तरावर कबड्डीमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या हरीश तावडे याची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. आपल्या छंदातून अर्थार्जन होणे यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगतानाच पॅडीने या वेळी, आपला मित्र इंजिनीअरिंग किंवा डॉक्टरीकडे वळतोय म्हणून आपणही तेच करावे असे करू नका, असा सल्लादेखील दिला. स्वत:तील कलागुणांचा शोध घ्या. घरच्यांना आपल्या कामगिरीची पूर्ण कल्पना दिल्यास त्यांचा मोलाचा पाठिंबा मिळतो. त्यामुळे घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नका, असेही पॅडीने सांगितले.या वेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एस.व्ही. संत, गोखले शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आर. जे. गुजराथी, उपप्राचार्य डॉ. एन. बी. आचार्य व डॉ. ए. गद्रे, क्रीडाप्रमुख संजय पवार आणि मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख विद्या नाईक यांची उपस्थिती होती.दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पॅडी, तावडे आणि डॉ. गुजराथी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच प्रियल राजगोर हिची यंदाच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून निवड करण्यात आली, तर गौरव म्हात्रे आणि अस्मिता मोरे यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी खेळाडूचा पुरस्कार पटकावला. (प्रतिनिधी)