‘फ्युचर मंत्रा’मधून विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन

By admin | Published: February 2, 2016 02:17 AM2016-02-02T02:17:05+5:302016-02-02T02:17:05+5:30

बारावीच्या परीक्षेला अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. परीक्षेच्या टेन्शनबरोबरच बारावीनंतर काय करायचे, हा मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेला असतो

Career guidance to students from 'Future Mantra' | ‘फ्युचर मंत्रा’मधून विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन

‘फ्युचर मंत्रा’मधून विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन

Next

मुंबई : बारावीच्या परीक्षेला अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. परीक्षेच्या टेन्शनबरोबरच बारावीनंतर काय करायचे, हा मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेला असतो. करिअरच्या असंख्य पर्यायांपैकी काय निवडावे? विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भातील अशा असंख्य शंकांचे निरसन ‘लोकमत’ आणि ‘व्हीआयटी’ आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ या सेमिनारमधून करण्यात आले.
‘लोकमत’ आणि ‘व्हीआयटी’ विद्यापीठाच्या वतीने ‘फ्युचर मंत्रा’ या करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन, शनिवारी दादर येथील धुरू हॉलमध्ये करण्यात आले होते. विज्ञान शाखेत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हीआयटी विद्यापीठाचे केमिस्ट्री विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. माधवेश पाठक यांनी मार्गदर्शन केले. बारावीच्या अभ्यासात गढून गेलेल्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून हलकाफुलका तणावमुक्त करणारा व्यायाम करून घेतला. इंजिनीअरिंगमध्ये करिअर करूइच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग पूर्वपरीक्षेची तयारी, इंजिनीअरिंगचा अभ्यास आणि त्यामधील भविष्य विद्यार्थ्यांना समजावून सांगत, त्यांनी
व्हीआयटी विद्यापीठाविषयी माहिती दिली.
‘इंजिनीअरिंग’मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या, पण पूर्वपरीक्षेला घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी पूर्वपरीक्षेसंदर्भातील महत्त्वाच्या टिप्स दिल्या, तसेच बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आणि इंजिनीअरिंगसाठी अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन त्यांनी या वेळी केले, तसेच इंजिनीअरिंगव्यतिरिक्त विज्ञान शाखेत येणाऱ्या अन्य विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या इतर संधीही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांना पडलेल्या अनेक शंकांचे निरसन पाठक यांनी केले.
शिवाय अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या परीक्षेला आत्मविश्वासपूर्ण सामोरे कसे जायचे, याचे मार्गदर्शन समर्थ एज्युकेअर एलएलपीचे संचालक समर्थ पालकर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील बारावीचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणारे फंडे सांगितले.
या दिवसांत आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम आहार आणि दिनचर्येबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली; तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण न घेता, खेळीमेळीचे वातावरण ठेवावे, सतत अभ्यास करण्याचा तगादा न लावता, अधूनमधून अभ्यास करण्यास प्रेरणा देणारे व्हिडीओ पाहू द्यावे, असा सल्ला देत, त्यांनीही प्रेरणा देणारी एक चित्रफीत कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना दाखविली.
‘मोबाइल’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ आणि ‘मोबाइल गेम्स’पासून लांब राहा, असेही पालकर या वेळी म्हणाले. आता शेवटच्या क्षणी काही येत नाही, म्हणून हताश न होता झालेला अभ्यास अगदी पक्का करा, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला. बारावीच्या प्रश्नपत्रिकेबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. या सेमिनारमधून प्रभावित होऊन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. माधवेश पाठक आणि समर्थ पालकर यांना गराडा घातला आणि करिअरबद्दलच्या अनेक शंकांचे निरसन करून घेतले. (प्रतिनिधी)
करिअर म्हणून काय निवडायचे हा प्रश्न होता, पण ‘फ्युचर मंत्रा’मधून अनेक शंकांचे निरसन झाले. याचा उपयोग नक्कीच होईल.
- रामेश्वर जगदाळे,
महर्षी दयानंद महाविद्यालय
हल्लीच्या स्पर्धेच्या युगात मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळवण्यासाठी धडपडावे लागते. साचेबद्ध करिअर न करता, अन्य पर्यायांमधून चांगले करिअर कसे निवडावे, हे ‘फ्युचर मंत्रा’मधून कळले.
- राधिका पाडावे, पालक

Web Title: Career guidance to students from 'Future Mantra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.