Join us

पालिकेच्या विद्यार्थ्यांना करिअरचे धडे

By admin | Published: March 27, 2016 2:42 AM

पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने दहावीनंतर काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. अनेक वेळा विद्यार्थी हुशार असूनही योग्य मार्गदर्शन

मुंबई : पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने दहावीनंतर काय, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहतो. अनेक वेळा विद्यार्थी हुशार असूनही योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्याचे करिअर भरकटते. त्यामुळे आपल्या या विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी पालिकेने त्यांना करिअरचा कानमंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम लवकरच पालिका शाळांमध्ये सुरू होणार आहे.स्पर्धेच्या या युगात आपल्या पाल्याला घडविण्यासाठी पालक प्रचंड मेहनत घेत आहेत. खासगी ट्युशन, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा अशा उपक्रमांद्वारे आपल्या मुलाची क्षमता वाढविण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्याच वेळी पालिका शाळेतील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी मागे पडत आहेत. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनाही घडविण्यासाठी पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांचे भविष्याविषयीचे ध्येय, करिअर कशा प्रकारे विकसित करावे, कोणत्या प्रकारची नोकरी, व्यवसाय निवडावा याचे मार्गदर्शन पालिकेमार्फत केले जाणार आहे. तसेच त्यांचे ध्येय साध्य होण्याच्या दृष्टीने त्या त्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी देण्यात येणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाचे उपक्रमही सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)