स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर

By admin | Published: May 31, 2017 06:44 AM2017-05-31T06:44:29+5:302017-05-31T06:44:29+5:30

करिअर म्हटलं की पालकांचा आणि नातेवाइकांचा पहिला प्रश्न असतो की, किती पैसे मिळणार, जॉब सिक्युरिटी काय?

Career in scuba diving | स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर

स्कूबा डायव्हिंगमध्ये करिअर

Next

-पूजा दामले -
करिअर म्हटलं की पालकांचा आणि नातेवाइकांचा पहिला प्रश्न असतो की, किती पैसे मिळणार, जॉब सिक्युरिटी काय? पण, आताची पिढी यापेक्षा वेगळा विचार करते. सिक्युरिटी त्यांनाही हवी आहे; पण, त्याचबरोबर त्यांचे छंद त्यांना जोपासायचे आहेत. त्यामुळे वेगळा हटके विचार करणाऱ्यांसाठी आणि निश्चितच आवड असणाऱ्यांसाठी हा एक चांगला करिअर आॅप्शन आहे.

लहानपणी अनेकांना पाण्यात खेळायला आवडते, खोल समुद्रात जावे अशी अनेकांची इच्छा असते. पण, पालकांच्या धाकामुळे मोठे होताना या इच्छा, आवडी मागे पडत जातात. वय वाढत जाते त्याचबरोबरीने शाळा, महाविद्यालयाच्या चार भिंतींतल्या वर्गातच शिक्षणाचे धडे गिरवताना या निसर्गाची आणि त्याच्या आवडींचा विसर पडतो. लहानपणापासून अ‍ॅडव्हेंचर, समुद्र आणि वेगळ्या वाटेने जगण्याची इच्छा असणाऱ्यांना ‘स्कूबा डायव्हर’ ही करिअरची उत्तम संधी आहे.
या करिअरसाठी तुम्हाला कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची अट नाही. पण, हो एक नक्कीच की तुम्हाला त्याची आवड हवी आणि तुमच्यात ते करण्याची हिंमत हवीच. नुसतीच समुद्राची आवड असून यात भागणार नाही, तुम्ही उत्तम स्विमर असणे आवश्यक आहे. कारण, तुम्ही एकटे समुद्राखाली जाणार नसता तर तुमच्यावर एका व्यक्तीची जबाबदारी असते. या करिअरचा पर्याय निवडल्यास फक्त परदेशातच नाही तर देशातही खूप संधी उपलब्ध आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात असलेले समुद्रकिनारे. देशात प्रशिक्षण घेतलेल्या स्कूबा डायव्हरला परदेशात आणि गल्फमध्ये जास्त पॅकेज मिळते.
कोची स्थित इंडियन नेव्ही डायव्हिंग स्कूल उच्च दर्जाचे कर्मशियल डायव्हिंग ट्रेनिंग सामान्यांना देते. या कोर्सला इंटरनॅशनल मरिन कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अ‍ॅफिलिएशन आहे. स्कूबा डायव्हिंगचे उत्तम प्रशिक्षण हे कॅलिफोर्निया येथे मिळते. प्रोफेशनल असोसिएशन आॅफ डायव्हिंग इन्स्ट्रक्टर (पीएडीआय) ही स्कूबा डायव्हिंग शिकण्याची उत्तम जागा आहे. येथून प्रशिक्षण घेतल्यास जगभरात कुठेही काम करता येऊ शकते. देशात गोव्यात सर्वाधिक जुनी एक संस्था आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ वॉटर स्पोर्ट्स या संस्थेतर्फे डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबई आणि बंगलोर येथेही काही संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते. द ठाणे स्कूबा डायव्हिंग क्लबतर्फे अमेरिकन कॅनडियन अंडरवॉटर सर्टिर्फिकेशन इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग कोर्स शिकविला जातो.
स्कूबा डायव्हिंग हे उत्तम करिअर आहे. आपल्या देशात स्कूबा डायव्हर तयार व्हावेत आणि परदेशात जाणारा पैसा कमी व्हावा हे आमचे पहिले उद्दिष्ट्य आहे. तरुणांमध्ये अ‍ॅडव्हँचर स्कील आणि नेतृत्वगुण वाढावेत. त्याचबरोबरीने तरुणांची शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढावी. याचबरोबरीने करिअरसोबत देशाची सेवाही करता येते. याचा फायदा पोलीस, अग्निशमन दलाला शोध कार्यात, आपत्कालीन परिस्थितीत केला जातो. त्यामुळेच हे करिअर उत्तम असल्याचे द ठाणे स्कूबा डायव्हिंग क्लबचे विजय पटवर्धन यांनी सांगितले.

Web Title: Career in scuba diving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.