मुंबई : लॉकडाउनमुळे सुट्टीच्या काळात पुढे काय करायचे? करिअरसंबंधी पर्याय कुठे उपलब्ध आहेत, याची चाचपणी करणारे विद्यार्थी घरी अडकून पडले आहेत. त्यातच सध्या कोणत्या प्रवेश परीक्षा सुरू आहेत किंवा होणार आहेत? कोणत्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या सगळ्याची माहिती मिळविणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून राज्याचा शिक्षण विभाग, युनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या एकत्रित सहकार्याने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करिअर गायडन्स पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे पोर्टल २७ मेपासून विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सरल आयडीवरून ओपन होणाऱ्या या महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आधुनिक कोर्सेसची उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग नववी ते बारावीतील ६६ लाख विद्यार्थ्यांना होऊ शकणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडयांनी दिली. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ५५६ कोर्सेस व २१००० व्यावसायिक संस्था व महाविद्यालयाची माहिती दिली असून कोर्सेसचा कालावधी, फी, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी इत्यादी माहिती असल्याची माहिती एमएससीआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.मुलामुलींना शिक्षण पूर्णहोताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो. संधी व गरज विचारात घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभागप्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले. शिक्षण घेताना संधी, योजना, शिष्यवृत्ती कोणत्या आहेत? कोणत्या मार्गाने निधी उभा करता येऊ शकतो हे सांगणारे पर्यायही या पोर्टलवर असल्याची माहिती त्यांनी दिली.शिक्षकांना प्रशिक्षणयुनिसेफने आतापर्यंत देशाच्या आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, झारखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान अशा ७ राज्यांत करिअर पोर्टल सुरू करण्यास मदत केली असून आतापर्यंत १० लाख विद्यार्थी त्यावर रजिस्टर आहेत. तर ५९,५५९ शिक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आल्याचीमाहिती त्यांनी दिली.
करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर; शिक्षण विभाग, युनिसेफचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 2:00 AM