बेफिकीर मुंबईकरांना मास्कचे महत्त्व अजून कळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 07:35 AM2020-09-28T07:35:08+5:302020-09-28T07:35:19+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्चपासून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळेस अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती

Carefree Mumbaikars still do not understand the importance of masks | बेफिकीर मुंबईकरांना मास्कचे महत्त्व अजून कळेना

बेफिकीर मुंबईकरांना मास्कचे महत्त्व अजून कळेना

Next

ओमकार गावंड

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना नाक आणि तोंडावर मास्क अथवा रुमाल वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही अनेक मुंबईकर घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. अनेक जणांच्या चेहऱ्यावरचा मास्क हा अक्षरश: नाक आणि तोंडाच्या खाली सरकलेला असतो. तर काही जण केवळ पोलिसांना पाहिल्यावरच कारवाईच्या भीतीपोटी मास्क वापरतात. यामुळे मास्कच्या वापराबाबत मुंबईकरांमध्ये खरोखरच गांभीर्य आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वत:ला कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास तो इतरांना होऊ नये. तसेच दुसºया व्यक्तीला कोरोना झाला असल्यास तो आपल्याला होऊ नये यासाठी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मात्र मास्कच्या वापराबाबत निम्मे मुंबईकर गंभीर नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने मार्चपासून सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यावेळेस अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर जूनपासून अनलॉकची प्रक्रिया करण्यात आली. मात्र अनलॉक करत असताना नागरिकांना एकमेकांमध्ये सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, चेहºयावर मास्क तसेच गर्दी न करणे अशा विविध अटी घालण्यात आल्या. अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली तरीही कोरोनाचा प्रसार मात्र थांबलेला नाही. असे असूनही अनेक नागरिक गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरताना दिसत नाहीत. तसेच एकमेकांमध्ये सामाजिक अंतरही राखताना दिसत नाहीत.

सकाळी उद्यानांमध्ये व्यायाम करण्यासाठी येणारे काही नागरिक ‘आम्हाला श्वसनास त्रास होतो व दम लागतो’ असे कारण देऊन मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात. तर बाजार व काही खरेदीच्या ठिकाणांवर अनेक विक्रेते व दुकान मालकही मास्क वापरत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असणाºया भागांमध्ये नाक्यावर जमलेल्या तरुण मंडळींमध्ये निम्म्या जणांनीच मास्क घातलेला असतो. तर काही जण मास्क नाक व तोंडाच्या खाली सरकवून एकमेकांशी बोलत उभे असतात. अनेक वाहनचालकही मास्क वापरण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. काही जण मास्क वापरायला सांगितल्यास ‘पावसात मास्क भिजल्यावर आमचा श्वास कोंडतो, त्यामुळे मास्क वापरत नाही’ असे कारण पुढे करतात.
मास्कच्या वापरात तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिक अधिक जागृत असल्याचे पाहायला मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना जवळपास ९० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठ नागरिक मास्कचा व हॅण्डग्लोव्ह्जचा वापर करतात. तर काही जण अधिक सुरक्षेसाठी फेस शिल्डचाही वापर करतात.

मुंबईत मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांकड़े दुर्लक्ष करत मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांविरुद्ध आतापर्यंत ६ हजार ६७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पश्चिम उपनगरात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांवरही कारवाईचा जोर वाढवला. यात २६ सप्टेंबरपर्यंत तब्बल ६ हजार ६७२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत उत्तर, पश्चिम भागात सर्वाधिक कारवाई करण्यास आली आहे. अनलॉकच्या काळात या कारवाईचा वेग कमी झाला आहे. पोलिसांकडून वेळोवेळी नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावरूनही त्यांना विविध पोस्टद्वारे मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

संसर्ग रोखण्यासाठी बंधनकारक

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरांमधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहºयावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनीही याला दुजोरा देत मास्कमुळे कोरोनासह अन्य प्रकारचा संसर्गही रोखण्यासाठी मदत होते, त्यामुळे मास्क लावण्याची सूचना दिली आहे. मास्क वापरण्याविषयीचे शासकीय निर्बंध हे वैद्यकीयदृष्ट्याही पडताळलेले आहेत. त्यामुळे मास्कचा वापर हा अनिवार्य असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

मास्क लावा; कोरोना पळवा!
1कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे. मात्र नागरिक तोंडाला मास्क लावत नाहीत. नागरिक मास्क घातल्याशिवाय फिरत असल्याबद्दल महापालिकेने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास कोरोना लवकरच नियंत्रणात येईल, असा दावाही पालिकेने केला आहे.

2मुंबई महापालिकेच्या म्हणण्यानुसार, तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. कारवाई सुरू आहे. तरीही नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यामुळे दंडाबरोबरच मास्क भेट देण्याचा उपक्रम काही विभागात सुरू करण्यात आला. एप्रिल महिन्यापासून मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

3महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते आॅगस्टपर्यंत २ हजार ७९८ नागरिकांकडून १ हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. दंडाची रक्कम १ हजार रुपयांवरून दोनशे रुपये करण्यात आली आहे. १३ ते १९ सप्टेंबर या कालावधीत ३ हजार ६१५ लोकांना विनामास्क पकडण्यात आले; ७ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला.

‘प्रिय ग्राहक, आपले तोंड, नाक मास्कने झाकूनच मॉलमध्ये या’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या प्रत्येक मॉलमध्ये कोरोनाला हरविण्यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. विशेषत: मॉलमध्ये प्रवेश करतानाच मास्क घालण्याची विनंती केली जात आहे. या व्यतिरिक्त प्रवेशद्वारावरच क्वारंटाइन शिक्का पाहण्यासह शरीराचे तापमान मोजले जात आहे. आणि त्यानंतरच मॉलमध्ये प्रवेश दिला जात असून, आत प्रवेश केल्यानंतरही ग्राहकांना मास्क लावण्याची विनंती तैनात सुरक्षारक्षकांकडून केली जात आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आता अनलॉकमध्ये हळूहळू का होईना अनेक गोष्टी सुरू झाल्या असून, यात मॉलचाही समावेश आहे. फिनिक्स, ओबेरॉयसारख्या मोठ्या मॉलमध्ये येणाºया ग्राहकांची संख्या वाढत असून, हा आकडा हजारोंच्या घरात आहे. मॉलमध्ये सुरुवातीपासून आरोग्याची काळजी घेतली जात आहे. प्रवेशद्वारावरच सामाजिक अंतर पाळले जात असून रांगेत बॅरिकेड्स लावले आहेत. यात सामाजिक अंतर राखत आखलेल्या वर्तुळातून पुढे पुढे सरकल्यानंतर प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेल्या ट्रेमध्ये सॅनिटायझरसदृश रसायन ओतले आहे.

Web Title: Carefree Mumbaikars still do not understand the importance of masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.