मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून मदतीचा हात पुढे येत असताना, काही ठग मंडळी याच मदतीआड फसवणूक करताना दिसत आहेत़ गरजू व्यक्तीना घरपोच जेवण पोहोचविण्याची फेसबुक पोस्ट वाचून मलबार हिलमधील ५४ वर्षीय महिलेने मदत मागितली. मात्र या मोफत जेवणासाठी त्यांना तब्बल ७५ हजार रुपये गमविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मलबार हिल परिसरात ५४ वर्षीय तक्रारदार महिला एकट्याच राहण्यास असून, फोर्टमधील एका नामांकित संस्थेच्या त्या सचिव आहेत. ३० तारखेला त्यांच्या मुलीने फेसबुकवर ‘ज्यांना जेवणाची आवश्यकता आहे त्यांनी संबंधित मोबाइल 8389992995 या क्रमांकावर संपर्क करण्याबाबतची पोस्ट पाहिली. याबाबत आईला सांगितले.
त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी कॉल करून मदत मागितली. तेव्हा राहुल नावाच्या व्यक्तीने कॉल घेत, एक लिंंक पाठवून त्यात माहिती भरून पाठविण्यास सांगितले. त्यावरून त्यांनी वर नमूद क्रमांकावरून टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवलेली लिंंक ओपन करून त्यामध्ये नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक ही माहिती भरून दिली.
त्यानंतर त्याने आणखीन एक लिंंक पाठवून एक अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितला. फोनवरून बोलणे सुरू असतानाच तक्रारदार यांच्या मोबाइलवर एकामागोमाग एक संदेश येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी संदेश पाहताच बँकेतून पैसे वजा होत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला.
‘गोपनीय माहिती शेअर करू नका’
फेसबुक, ट्विटर तसेच व्हॉट्सअपवरून मोठ्या प्रमाणात मदतीचे संदेश, पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामुळे अशा संदेशाची खातरजमा करणे गरजेचे आहे. गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका. फसवणूक होतेय असे वाटल्यास थेट मुंबई पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहनही पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.