सावधान, लेप्टो पसरतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:13 AM2018-06-28T04:13:06+5:302018-06-28T04:13:09+5:30

पावसाच्या आगमनामुळे शहर-उपनगरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. लेप्टोपायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांचे प्रमाण वाढत असून, यांपासून बचावाकरिता वेळीच प्रतिबंधात्मक काळजी घेणे

Careful, leprosy is spreading ..! | सावधान, लेप्टो पसरतोय..!

सावधान, लेप्टो पसरतोय..!

Next

मुंबई : पावसाच्या आगमनामुळे शहर-उपनगरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे. लेप्टोपायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो या आजारांचे प्रमाण वाढत असून, यांपासून बचावाकरिता वेळीच प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांत शहर-उपगरात लेप्टोमुळे तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे सध्याचे बदलते वातावरण पाहता, मुंबईकरांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी सोमवारी गेला. कुर्ल्यातील १४ वर्षांच्या प्राचील काळे याचा मृत्यू लेप्टोमुळे झाल्याचा पालिकेच्या आरोग्य खात्याला संशय आहे. जसजसा पाऊस वाढतो, तसे साथीचे आजार डोके वर काढताना दिसून येतात. गेल्या वर्षीही लेप्टोचे सात बळी गेले होते, तर २३९ बाधित रुग्ण आढळून आले होते. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या हिवताप, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो, टायफॉईड यांसारख्या आजारांवर स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे. परिसरात कचरा आणि पाणी साचणार नाही याची काळजी घेतल्यास मलेरिया किंवा डेंग्यू यांसारख्या आजारांवर सहज मात करता येईल. लहान मुलांनाही विविध आजारांची लागण व्हायला लागली आहे. ताप, पडसे, हिवताप, जुलाब आणि उलट्या यांसारख्या आजारांमुळे मुलेही अक्षरश: हैराण झालेली आहेत. याशिवाय डासांची उत्पत्ती जास्त झाल्याने रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात योग्य पद्धतीने आरोग्याची काळजी घेतल्यास आजारांवर मात करता येईल.

बदलत्या ऋतुमानानुसार या काळात आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे या काळात शरीराचे स्वास्थ्य निरोगी राखण्यासाठी योग्य आहार आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. तसेच, काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. आरोग्य यंत्रणांनीही या आजारांविषयी जिल्ह्यात तसेच प्रत्येक विभागात जनजागृती अभियान राबविणे गरजेचे आहे.
- डॉ. नूतन मथानी, फिजिशियन.

लेप्टोने घेतला दुसरा बळी : इम्तियाज मोहम्मद अली (२८, गोवंडी, शिवाजी नगर) याचा लेप्टोमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यावर सायन रुग्णालयाच्या आयसीयू विभागात उपचार सुरू होते. त्याला श्वसनाचा त्रास होत होता. यापूर्वी, कुर्ला येथील प्राचील काळे या १४ वर्षीय मुलाचा लेप्टोमुळे मृत्यू झाला होता. पालिकेच्या साथरोग विभागाच्या डॉ. शीला जगताप यांना विचारले असता, साथरोगाचा अहवाल पालिकेकडे सुपुर्द केला असल्याचे सांगितले. सायनमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला असून, हे प्रकरण समितीकडे पाठवले आहे, त्यामुळे यावर आताच बोलणे योग्य नसल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

ताप, स्नायुदुखी, मूत्रपिंड आणि यकृताचे काम बंद पडणे ही लेप्टोची प्रमुख लक्षणे आहेत. लेप्टो रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होऊन त्याची प्रकृती गंभीर होते. त्याच्यावर औषध उपचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावतो. ही बाब प्रशासन यंत्रणेने सर्वांच्याच लक्षात आणून द्यायला हवी. या आजाराची तीव्रता अचानक वाढते, तोपर्यंत रुग्णाकडे कमी वेळ असतो याची खबरदारी घेऊन वेळीच औषधोपचार केले पाहिजेत.
- डॉ. दुर्गेश सोमानी, श्वसन विकार तज्ज्ञ.


लक्षणे : तीव्र ताप, थंडी वाजणे, थकवा, डोकेदुखी, अतिसार, उलट्या होणे
पोटदुखी, सांधेदुखी, पुरळ, लालसर डोळे

प्रतिबंधात्मक उपाय
घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा
बाहेरचे पाणी, उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा
घरात अन्न झाकून ठेवा
उघड्या पायाने पावसाच्या पाण्यात जाऊ नका
पावसात भिजून आल्यास लगेचच हात, पाय साबणाने स्वच्छ धुऊन घ्या

Web Title: Careful, leprosy is spreading ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.