सावधान! मुंबईत २६ जुलैला होणार अतिवृष्टी; स्कायमेटचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:33 AM2019-07-23T04:33:46+5:302019-07-23T06:28:47+5:30
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार
मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस वाढेल. येथे २६ जुलैला अतिवृष्टी होईल. २७ आणि २८ जुलै रोजीही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तर, २६ जुलैला कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सध्या उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस वाढेल. २५ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढू शकते. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. २६ जुलैला पावसाचे प्रमाण आणखी वाढेल. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या पावसाची यंदा पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. २७ आणि २८ जुलै रोजीही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
दरम्यान, रविवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास मुंबई शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईकरांना धडकी भरवली. विशेषत: उपनगराच्या तुलनेत शहरात अधिक वेगाने आणि अधिक काळ पडलेल्या पावसामुळे पुन्हा मुंबई तुंबते की काय? अशी भीती मुंबईकरांना वाटू लागली. मात्र रविवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास पावसाचा वेग मंदावल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ४४ आणि सांताक्रुझ येथे १५.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरात २ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ६ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, सध्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच उत्तर केरळ आणि कर्नाटकमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसाचा प्रवास उत्तर दिशेने होणार असून, याचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस वाढेल. २५ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढू शकते. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. २६ जुलैला पावसाचे प्रमाण आणखी वाढेल. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या पावसाची यंदा पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. २७ आणि २८ जुलै रोजीही जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.
आज कोकणात जोरदार
२३ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२४ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२५ जुलै : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
२६ जुलै : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
विदर्भात २४ जुलैनंतरच चांगला पाऊस पडणार
मध्य महाराष्ट्रात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात पडत आहे. विदर्भात काही भागात चांगला पाऊस झाला आहे. तथापि, मराठवाडाचे हवामान जवळपास कोरडे आहे. पुढील दोन दिवसांत मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल. २७ जुलैपर्यंत हे चक्र सुरूच राहील. विदर्भातील हवामान २४ जुलैपर्यंत हलक्या पावसासह मुख्यत: कोरडे राहील. त्यानंतर या क्षेत्रात मान्सूनचा चांगला पाऊस पडेल.