Join us  

पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करा

By admin | Published: October 24, 2015 2:43 AM

महापालिकेची स्वत:ची धरणे आहेत. सुमारे १२५ किलोमीटर अंतरावरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. पण या वर्षी पाण्याचा तुटवडा

मुंबई : महापालिकेची स्वत:ची धरणे आहेत. सुमारे १२५ किलोमीटर अंतरावरून जलवाहिन्यांद्वारे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येतो. पण या वर्षी पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन प्रशासन काळजीपूर्वक नियोजन करत असल्याचे प्रतिपादन शहराचे पालकमंत्री, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. तर या वर्षी पाणीसाठा कमी असल्याचे लक्षात घेऊन पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.दादर येथील महापौर निवासात दादर, माहीम, प्रभादेवी भागातील नागरिकांसाठी ‘पाणी परिषद’ आयोजित करण्यात आली होती, या वेळी सुभाष देसाई आणि स्नेहल आंबेकर बोलत होत्या. देसाई म्हणाले की, पाणी प्रश्न हा दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने या वर्षी धरणेसुद्धा अपुरी भरलेली आहेत. महापालिका सुमारे १.२५ कोटी जनतेला पाणीपुरवठा करते. हे काम प्रशासन जिकिरीने पार पाडते. पाण्याचा तुटवडा असूनही महापालिका नियोजनपूर्वक आवश्यक पाणीपुरवठा करू शकेल, ही बाब लक्षात घेऊनच संपूर्ण वर्षभराचे नियोजन केले आहे. तांत्रिक कारणे असली तरी पाण्याबाबत समान न्याय महापालिकेने अवलंबावा, असेही त्यांनी सांगितले.स्नेहल आंबेकर म्हणाल्या, दादरसह अन्य भागांत काही तांत्रिक कारणास्तव कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करून त्यावर उपाय शोधेल. स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे धरणेही कमी प्रमाणात भरली आहेत. पाणीपुरवठा सुनियोजित करण्यासाठी प्रशासन योग्य पद्धतीने काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी या वर्षीचा अपुरा पाऊस लक्षात घेऊन पाणी जपून वापरावे, असे आवाहनही महापौरांनी केले.आयुक्त अजय मेहता म्हणाले की, जी/उत्तर व जी/दक्षिण भागातील काही इमारतींमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याची माहिती आहे. रस्त्यांची कामे होत असल्याने काही प्रमाणात अडचण असेल तर, ती लवकरात लवकर दूर करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. पाणीपुरवठा वाढविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या धरणांची कामे करण्यात येत आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणीही वापरता येईल का? यावरही प्रशासनाचा विचार सुरू आहे. या वर्षी पावसाचे प्रमाणच कमी आहे. मुंबईपेक्षा राज्यांत इतर ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईला पाण्याचा प्रश्न तेवढ्या तीव्रतेने भेडसावत नाही. पण तरीही आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)