आर्थिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेडया
केअरटेकरनेच विकला मालकाचा १०० कोटींचा बंगला २४ कोटींना
जुहूतील प्रकार; आर्थिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विश्वासू केअरटेकरने एनआरआय मालकाचा १०० कोटींचा बंगला अवघ्या २४ कोटीत विकल्याचा धक्कादायक प्रकार जुहूमध्ये समोर आला. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी केअरटेकर राजेश ठाकूर (५२) याच्यासह त्याचे साथीदार सुरेश ग्रोवर आणि समर्थ सिंग यांना अटक केली.
बांधकाम व्यावसायिक जिग्नेश शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१२ मध्ये ग्रोवर त्यांच्या संपर्कात आला. त्याने जुहू परिसरातील ६ हजार ३२९ स्क्वेअर फूटचा बंगला मालक विकत असल्याचे सांगितले. मूळ मालक असलेले पटेल कुटुंब अमेरिकेला राहण्यास आहेत. ते कधी तरी भारतात येतात. त्यांना हा बंगला २४ कोटीत विकायचा असल्याचे ग्राेवरने सांगितले. बंगल्याची कागदपत्रे दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनीही बंगला घेण्याची तयारी दाखवली. पुढे तीन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचे ठरले.
पहिला हप्ता दिल्यानंतर बंगल्याची काही कागदपत्रे केअरटेकर ठाकूरने त्यांना दिली. दुसरा हप्ता दिल्यानंतर पाॅवर ऑफ ॲटर्नी दिली. तिसरा हप्ता देण्यापूर्वी बंगल्यासंबंधित न्यायालयात वाद प्रलंबित असल्याची माहिती शाह यांना मिळाली. त्यांनी याबाबत ग्रोवरकडे चौकशी करताच त्याच्यासह समर्थ सिंग, ठाकूरने लवकरात लवकर ते प्रकरण मिटविणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर आपला बंगला केअरटेकर परस्पर विकत असल्याची माहिती मिळताच पटेल कुटुंबीयांनी जुहू पोलिसात तक्रार दिली. तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले. दरम्यान, या तिघांनी न्यायालयीन प्रकरण मिटविण्यासाठी आणखी पैशांची मदत लागणार असल्याचे शाह यांना सांगितले. बरेच दिवस उलटूनही बंगला ताब्यात न आल्याने त्यांना संशय आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी गेल्या महिन्यात याबाबत जुहू पोलिसात तक्रार दिली होती.
* गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग
जुहू पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवला. पुढे ताे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. २०१३ आणि २०१४ मध्ये शाह यांनी या ठगांना पैसे दिले होते. तिघांनीही प्रत्येकी ८ कोटीनुसार २४ कोटी रूपयांचा व्यवहार ठरवला होता. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
...................................