- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून मालाची वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार अद्यापही सुरूच आहे. एसटीच्या बसमध्ये बॉम्ब आढळल्याच्या घटनेनंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी वाहतुकीच्या बसमधून मालवाहतुकीला बंदी घातली होती. मात्र, घटनेला एक महिना उलटत आला असतानाही अद्यापही आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.गतमहिन्यात पनवेलच्या आपटा बस आगारात उभ्या असलेल्या एसटीमध्ये आयईडी बॉम्ब आढळल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रवासी बसमधून मालवाहतूक करण्यावर बंदी घातली होती. मात्र, आदेशाला महिना उलटत आला तरीही आरटीओसह संबंधित प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.बहुतांश खासगी ट्रॅव्हल्सच्या बस केवळ कुरियरच्या मालवाहतुकीच्या उद्देशानेच चालवल्या जात आहेत. याकरिता दुपारच्या सुमारास बसच्या खालच्या भागात पूर्णपणे कुरियरचे सामान भरून ठेवल्यानंतर रात्री प्रवाशांना घेवून ठरलेल्या मार्गावर प्रवासाला सुरवात केली जाते. नवी मुंबईसह पनवेल, ठाणे व मुंबई परिसरात अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्याठिकाणी रस्त्यालगत ट्रॅव्हल्स उभ्या करून माल भरताना दिसत आहेत.ट्रक अथवा कंटेनरमधून मालवाहतूक करण्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी कुरियर कंपन्यांकडून हा पर्याय निवडला जात आहे. त्याकरिता काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मालवाहतूक व प्रवासी वाहतूक या दुहेरी उद्देशाने राज्यासह राज्याबाहेरच्या वेगवेगळ्या मार्गावर बस सुरू केल्या आहेत. तर प्रवासी मिळवण्यासाठी काही ट्रॅव्हल्सकडून ज्वलनशील पदार्थांसह दुचाकी देखील बसच्या डिकीत कोंबल्या जात आहेत. एपीएमसी बाजारपेठेत माल पाठवण्यासाठी देखील ट्रॅव्हल्सच्या टपावरून सामान पाठवले जात आहे. दिवस-रात्र उघडपणे हा प्रकार चालत असतानाही वाहतूक पोलिसांसह आरटीओची होणारी डोळेझाक गंभीर दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.प्रवासी बसमध्ये प्रवाशांच्या सामानाव्यतिरिक्त इतर मालाच्या वाहतुकीवर बंदी आहे. त्यानंतरही वोल्होच्या डिकीत कुरियरच्या मालासह इतर साहित्य भरले जात आहे. मात्र, परिवहन विभागाला प्रवाशांच्या जीवाचे गांभीर्य नसल्याने अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे, तर एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाईचा दिखावा केला जातो. - विनय मोरे, प्रवक्ता, सारथी सुरक्षा
खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतूक सुरूच; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 5:41 AM