Join us

आरेच्या जागेवरच होणार मेट्रो-३ ची कारशेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:45 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रकल्पातील अडचण दूर झाली आहे.

- अजय परचुरे मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रकल्पातील अडचण दूर झाली आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली खंडपीठाने आरेमध्ये होणाऱ्या बांधकामावरची स्थगिती उठवली असून निकाल एमएमआरसीच्या बाजूने दिल्याने आरेतील जागेवर मेट्रो-३ प्र्रकल्पातील आरे कारशेड बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेली अनेक वर्षे आरे कारशेडविरोधात लढणाºया पर्यावरणवादी संस्थांसाठी हा निकाल धक्कादायक ठरला आहे.मेट्रो-३ प्रकल्पासाठी एमएमआरसीने आरे जंगलात ३३ एकर जागेची निवड केली होती. या जागेवर कारशेड उभारू नये यासाठी पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. आधी मुंबई उच्च न्यायालय व नंतर राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिकाही दाखल केल्या, ज्यात पर्यावरणवाद्यांच्या बाजूने निर्णय झाले होते. मात्र गुरुवारच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या दिल्ली खंडपीठापुढील सुनावणीत हा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात गेला. आरेत भराव करणे, झाडे तोडणे व डेब्रिज टाकण्यास दिलेली स्थगित उठवली आहे.आरे कारशेडसमोरील सर्व अडचणी दूर झाल्या असून आता आरेमध्ये जलदगतीने काम करून हा प्रकल्प सुरू करण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.आता आम्ही ही लढाई सुप्रीम कोर्टात घेऊन जाणार आहोत. तसेच आरेमध्ये मेट्रोने झाडे कापण्यास सुरुवात केली तर आम्ही बांधकाम परिसरात आंदोलन सुरूच ठेवू, अशी प्रतिक्रिया वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी स्टॅलिन यांनी दिली.

टॅग्स :मेट्रो