Join us

मुंबईतील काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने दैनंदिन रुग्ण व मृत्यूंतही वाढ होत असल्याचे दिसून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याने दैनंदिन रुग्ण व मृत्यूंतही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, दि. ५ ते ११ एप्रिलदरम्यान मुंबईतील काेराेना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण थेट २२ टक्क्यांवर गेल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मार्चअखेरीस २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ते १८ टक्के होते.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पाच ते अकरा एप्रिलदरम्यान ३ लाख ४ हजार ७३६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यात ६७,७८९ कोरोनाबाधितांचे निदान झाले. २९ मार्च ते ४ एप्रिल या काळात २ लाख ८८ हजार ७१७ कोरोना चाचण्यांद्वारे ५३,६८१ बाधितांचे निदान करण्यात आले. मुंबईत मार्च महिन्यात रुग्णवाढीचे प्रमाण ५५ टक्क्यांनी वाढले. याच महिन्यात मुंबईत काेराेनामुळे २१५ मृत्यू झाले. एप्रिल महिन्यात हे प्रमाण वाढले. १२ एप्रिलपर्यंत ३७६ बळी गेल्याची माहिती पालिकेने दिली. जानेवारी आणि फेब्रुवारीत हे प्रमाण अनुक्रमे २३७ आणि १२७ इतके होते.

मानसिकता बदलायला हवी!

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, लॉकडाऊन केल्यानंतर दैनंदिन रुग्णसंख्या निश्चित कमी होईल, मात्र नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवून कोरोनाविषयी बेफिकिरी, निष्काळजीपणाची मानसिकता बदलल्यासही तितकीच परिणामकारकता दिसून येईल. शासनाकडून लॉकडाऊनचा करण्यात येणारा विचार हा केवळ अतिरिक्त यंत्रणा उभारण्यासाठीचा कालावधी आहे. खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

......................