मुंबई : इंधनाचे दर वाढलेले असताना कारने जाणे परवडत नाही. परंतु, सध्या तुरळक ठिकाणी सुरू असलेल्या कारपूलिंगला लवकरच कायदेशीर मान्यता मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, ॲप आधारित धोरणात कार पूलिंगचा समावेश होणार आहे.नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती परिवहन विभागाने दिली. एखादी व्यक्ती कारने एकटीच जात असेल पण त्याच मार्गावरून दुसऱ्या व्यक्तीला प्रवास करायचा असेल तर त्या कार मालकाला इंधन खर्चाच्या २५ ते ३५ टक्के रक्कम देऊन ती व्यक्ती प्रवास करू शकते. त्या कारमालकाला ॲपवर कारमध्ये जागा उपलब्ध असल्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर प्रवासी कार बुकिंग करू शकतात.
प्रदूषण कमी व्हावे, वाहतूककोंडी कमी व्हावी, वाहनांचा योग्य वापर व्हावा हे केंद्र आणि राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. जोपर्यंत राज्य सरकार बंदी घालत नाही तोपर्यंत प्रवासी वाहतूक परवाना नसलेली वाहने पूलिंगची सेवा देऊ शकतात. प्रवासी परवाना नसलेल्या वाहनांना शहरात एका दिवशी ४ राईड शेअर ट्रिप आणि आठवड्यात शहराबाहेर २ शेअर ट्रिपची परवानगी आहे. पण, वाहन चालकाला प्रवाशाचा किमान ५ लाख रु.चा विमा उतरविणे आवश्यक आहे, असे केंद्राच्या धोरणात म्हटले आहे.
ब्रिटन आणि अमेरिकेच्या धर्तीवर असलेली कारपूलिंग संकल्पना चांगली आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहने कमी होतील. वाहतूककोंडी टळेल. या संकल्पनेमुळे प्रदूषण कमी होईल. पण, सरकारने अशी संकल्पना केवळ सुरू करू नये तर चांगल्या प्रकारे राबवण्यावर भर द्यावा तरच फायदा होईल. - अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ