लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:51 PM2020-07-12T18:51:05+5:302020-07-12T18:51:32+5:30
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी
मुंबई : मध्य रेल्वेच्या एकट्या मुंबई विभागाने लॉकडाऊन काळात एकूण १ लाख ८ हजार वॅगन्समधून देशभरात अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक करण्यात आली आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर, नागपूर, पुणे, भुसावळ या विभागातून २३ मार्च ते ९ जुलैपर्यंत २ लाख ७४ हजार वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक केली आहे.
कोरोनाच्या काळात रेल्वे प्रशासन मालगाड्या व पार्सल गाड्या चालवून अत्यावश्यक सामग्रीची वाहतूक करत आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या एकट्या मुंबई विभागात १ लाख ७ हजार ९९३ वॅगन्सची मालवाहतूक करण्यात आली. ज्यामध्ये ७४ हजार ५८५ कंटेनर वॅगन्स, खतांचे ११ हजार ६६ वॅगन्स, पेट्रोलियम आणि तेल उत्पादनांचे ८ हजार ४६३ वॅगन्स, लोह व स्टीलचे ५ हजार ९६९ वॅगन्स, कोळशाचे ४ हजार ४८५ वॅगन्स आणि इतर संकीर्ण वस्तूंचे ३ हजार ४२५ वॅगन्सचा समावेश आहे.
जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी मालगाडी, पार्सल सेवा सुरू आहे. फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशवंत वस्तूंसाठी पश्चिम रेल्वेने पार्सल विशेष ट्रेनचे मार्ग निश्चित केले. त्यानुसार अन्नधान्य,पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत. २३ मार्च ते १० जुलै या लॉकडाऊन कालावधीत पश्चिम रेल्वेने ३९२ पार्सल गाडया चालविल्या. यातून ७४ हजार टन सामग्रीची वाहतूक केली आहे. यामधून पश्चिम रेल्वेला २३ कोटी ६८ लाख रुपयांचा महसुल मिळालेला आहे. पश्चिम रेल्वेने २२ मार्च ते १० जुलै दरम्यान ८ हजार ७७३ मालगाड्यांच्या आधारे १८.५ दशलक्ष टन मालाची ने-आण केली आहे. या काळात ५६ दुधाच्या ट्रेन चालविण्यात आल्या. त्यातून पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत सुमारे ७ कोटी २६ लाख रुपयांची भर पडली आहे. याशिवाय ३२६ कोव्हीड-१९ विशेष पार्सल वाहतुकीमधून १४ कोटी २६ लाखांचे उत्पन्न मिळाले.