Join us  

केअर टेकरच्या मृत्यूचे गूढ उकलले

By admin | Published: February 16, 2016 3:04 AM

कफपरेड येथील मेकर टॉवरच्या १९ व्या मजल्यावरुन कोसळून मृत्युमुखी पडलेल्या २७ वर्षीय समिता तांबे या केअर टेकरच्या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले

मुंबई : कफपरेड येथील मेकर टॉवरच्या १९ व्या मजल्यावरुन कोसळून मृत्युमुखी पडलेल्या २७ वर्षीय समिता तांबे या केअर टेकरच्या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. पायात रुतलेली काच काढण्यासाठी समिताला बळजबरीने किचनच्या ओट्यावर बसविण्यात आले. त्यात मद्याच्या नशेत असताना तोल जाऊन ती खाली कोसळल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तिघांना अटक करण्यात आली.कफपरेड येथील मेकर टॉवरच्या १९ व्या मजल्यावर हिरे व्यापारी रमेश भोजवाणी(६५) राहतात. यापूर्वी त्याच परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते. १० दिवसांपूर्वीच ते मेकर टॉवरमध्ये राहण्यास आले होते. त्यांची बहिण अमेरिकेत असते. ते अरुणा इंगोले (२७) या तरुणीसोबत येथे राहत होते. सहा महिन्यांपासून समिता त्यांच्याकडे ३० हजार रुपये वेतनावर दोन शिफ्टमध्ये काम करत होती. शुक्रवारी रात्री भोजवाणीचा वाढदिवस असल्याने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीनंतर नातेवाईक निघून गेले. तेव्हा भोजवानी यांचे कर्मचारी सुमन उर्फ संजू गोणा राऊत (३५) उबदी उर्फ किशोर दास (३५), पवन यादव (२५), रामनारायण राऊत (३२), राज राम राऊत (३२) हे तेथे उपस्थित होते. पार्टीनंतर समितासह या कर्मचारी वर्गाने भोजवानीचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर भोजवानीने कर्मचाऱ्यांना मद्य दिले. ११ वाजता समिताला तिच्या प्रियकराचा फोन आला होता. त्याने तिची विचारपूस केली. तेव्हा सारेजण मद्याच्या नशेत असल्याची माहिती देऊन तिने फोन ठेवला. रात्री दीडच्या सुमारास समिताही मद्याच्या नशेत असताना तिच्या पायात काच रुतली. काच काढण्यासाठी सुमनने तिला किचनच्या ओट्यावर चढविले. ओट्यालगत असलेल्या खिडकीस ग्रील नसल्याने ती मोकळी होती. अशात सुमन तिच्या पायाची काच काढत असताना तिने केस बांधण्यासाठी हात मागे केला आणि ती तोल जाऊन थेट खाली कोसळली. चारही आरोपींनी झालेला प्रकार भोजवाणीला सांगितला. मात्र नवीन राहण्यास आल्याने कुणाला काही कळणार नाही, म्हणून भोजवाणीने त्यांना शांत राहून घरी जाण्यासाठी सांगितले. सुरक्षा रक्षकाला काहीतरी पडल्याचा आवाज आला. मात्र गाढ झोपेत असलेल्या सुरक्षा रक्षकाने उठून पाहण्याची तसदी घेतली नाही. मद्याच्या नशेत बाहेर पडत असताना दोनच्या सुमारास सुमनचा सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता. मात्र सुरक्षा रक्षकाने दुर्लक्ष करत त्याला इमारतीबाहेर हाकलले आणि तो झोपला. सकाळी आठच्या सुमारास याच इमारतीतील महिलेची नजर समिताच्या मृतदेहावर पडली आणि हा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)