मुंबई : राज्य शासनाच्या १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेचे फिरत्या दवाखान्यात रूपांतर व्हावे, यासाठी वन रुपी क्लिनिकने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. रुग्णवाहिकेचा वापर फक्त रुग्णांची ने-आण करण्यासाठी न करता, फिरता दवाखाना म्हणून करण्याची परवानगी द्यावी, यासाठीचा प्रस्ताव वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.वन रुपी क्लिनिकतर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावात रुग्णवाहिकेत उपलब्ध असणाऱ्या डॉक्टरांना अटी आणि कायद्यानुसार योग्य तो पगार दिला जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत राज्यभरात १०८ अत्यावश्यक सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकेत अत्यावश्यक सेवेच्या वैद्यकीय यंत्रणा सज्ज असतात. १०८ सेवेप्रमाणेच मॅजिकडील, वन रुपी क्लिनिककडून मुंबईतील रुग्णांना अत्यावश्यक सेवा देत असल्याचा अनुभव डॉ. राहुल घुले यांनी सांगितला. यात ५० हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गोल्डन अवरमध्ये १ हजार ५०० रुग्णांना रुग्णसेवा दिली असल्याचेही डॉ. घुले म्हणाले.प्रत्येक दिवशी एका रुग्णवाहिकेच्या डॉक्टर टीमकडून ५० रुग्ण तपासले गेल्यास, राज्यभरात ४६ हजार ८५० रुग्णांना रुग्णसेवा एका दिवशी मिळू शकते. म्हणजेच वर्षाला एक कोटी ७१ लाख दोनशे ५० रुग्णांना रुग्णसेवेचा फायदा होईल, असेही डॉ. घुले यांनी अधोरेखित केले.
फिरत्या दवाखान्यांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:30 AM